Advertisement

नववी नापासांसाठी खुशखबर! फेरपरीक्षेची मिळणार संधी!

दहावीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाणेच नववीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचीही फेरपरिक्षा घेण्यात येणार असून येत्या जून महिन्यापासून या निर्णयाची अंबलबजावणी होणार आहे.

नववी नापासांसाठी खुशखबर! फेरपरीक्षेची मिळणार संधी!
SHARES

गेल्या काही वर्षांत इयत्ता नववीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने एक भन्नाट युक्ती शोधून काढली आहे. दहावीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाणेच नववीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचीही फेरपरिक्षा घेण्यात येणार असून येत्या जून महिन्यापासून या निर्णयाची अंबलबजावणी होणार आहे.


पहिल्यांदाच होणार फेरपरीक्षा

प्रत्येक शाळा दहावीचा निकाल चांगला लागावा यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते. त्यासाठी काही शाळा तर नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे पेपरही कठीण पद्धतीने बनवतात. मात्र, या संपूर्ण प्रकारामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नववीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. त्याशिवाय नापास झालेले बरेच विद्यार्थी खासगीरित्या १७ नंबरचा फॉर्म भरून दहावीची परीक्षा देत होते. या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये व त्यांना पुन्हा एक संधी मिळावी या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नववीतील अनेक विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला असून, दहावीसह प्रथमच नववीतील विद्यार्थ्यांचीही फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.


खासगीरित्या फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी

शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असून संबंधित शाळांच्या निकालाचा टक्काही सुधारेल, तसेच खासगीरित्या फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी होईल, असे मत अनेक शिक्षकांकडून वर्तविण्यात येत आहे.

राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी, शिक्षक उपसंचालक, शिक्षण निरीक्षकांना या संदर्भात पत्र पाठवण्यात आले असून लवकरात लवकर प्रत्येक शाळांमध्ये ही फेरपरीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.



हेही वाचा

दहावी पेपरफुटीचंं औरंगाबाद कनेक्शन


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा