Advertisement

स्वातंत्र्य दिनी शिक्षकांना 'स्वातंत्र्य' नाहीच

स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी झेंडावंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर शिक्षकांना घरी न जाता दुपारी १.३० वाजेपर्यंत शाळेत थांबावं लागणार आहे.

स्वातंत्र्य दिनी शिक्षकांना 'स्वातंत्र्य' नाहीच
SHARES

स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या दिवशी सकाळी शाळेत झेंडावंदन करून प्रमुख पाहुण्यांचं भाषण संपल की, विद्यार्थ्यांना नाश्ता देऊन सर्व शिक्षक घरी जात होते. परंतु यापुढे झेंडावंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर शिक्षकांना घरी न जाता दुपारी १.३० वाजेपर्यंत थांबावं लागणार आहे, अन्यथा तो दिवस त्यांचा अर्धा दिवस किंवा रजा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल, असे आदेश मुंबई महापालिका शिक्षण विभागानं दिले आहेत.


दुपारपर्यंत शाळेतच 

मुंबईसह इतरत्र विविध शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन तसचं शिक्षक दिन हे दिवस विनाअध्ययन दिन म्हणून समजण्यात येतात. यादिवशी शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. सकाळच्या वेळात सुरू झालेले हे कार्यक्रम साधारण ११ वाजेपर्यंत संपतात. ते संपल्यानंतर सर्व शिक्षक व विद्यार्थी आपापल्या घरी निघतात. परंतु विनाअध्ययन दिन हे शिक्षकांच्या ७६ दिवसांच्या सुट्टीत येत नसल्यानं बायोमेट्रीक हजेरी नोंदवण्यासाठी शिक्षकांना दुपारपर्यंत शाळेतच थांबाव लागणार आहे. असे आदेश शिक्षण विभागाने दिले  आहेत. या दिवशी शिक्षकांना सकाळी ७.१० ते दुपारी १.१० पर्यंत शाळेत उपस्थित राहावं लागेल व त्यांची बायोमेट्रीक हजेरी नोंदवावी लागेल. तसेच या दिवशी अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियमानुसार असणारी रजा नोंदवण्यात यावी, असंही या आदेशात म्हटलं आहे.


बायोमेट्रीक हजेरीमुळं त्रस्त 

मुंबई पालिका प्रशासनानं सर्व कर्मचाऱ्यांसह मुंबईतील विविध शाळेत बायोमेट्रीक हजेरी सुरू केली आहे. बायोमेट्रीक या प्रणातील ठरवून दिलेल्या तासाप्रमाणं तास न भरल्यास त्या व्यक्तीची उपस्थिती ग्राह्य धरली जात नाही. यामध्ये काही त्रुटी असल्यानं अनेक कर्मचाऱ्यांचं वेतन कापलं जात असून  बायोमेट्रीक हजेरीवरून सर्व शाळांचे शिक्षक त्रस्त आहेत.


गेली कित्येक वर्षे सर्व शाळांमध्ये या चार दिवशी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. हा कार्यक्रम सकाळच्या वेळेत आयोजित करण्यात येत असून तो संपल्यानंतर सर्व विद्यार्थी घरी जातात. त्यानंतर सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर शिक्षकांसह सर्व शिक्षकेतर कर्मचारी घरी जातात. ही पद्धत फार पूर्वीपासून सुरू असून केवळ बायोमेट्रिकचं कारण पुढं करत असा आदेश काढून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेठीस धरलं जातं. या सर्व कार्यक्रमासाठी शिक्षक अनेकदा अतिरिक्त वेळ खर्च करून त्याचा मोबदला घेत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने काढलेल्या या आदेशाचा फेरविचार करावा.
 - प्रशांत रेडिज, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघ




विनाअध्ययनाचे दिवस हे शिक्षकांसाठी असलेल्या ७६ दिवसांच्या रजांमध्ये येत नसल्यानं त्या दिवशी बायोमेट्रिक पद्धतीने त्यांची उपस्थिती लावून शिक्षकांनी पूर्ण दिवस भरणं आवश्यक आहे. तसचं या काळात शिक्षकांनी कोणत्याही अध्ययनाचे काम करणं अपेक्षित नाही.

- महेश पालकर, शिक्षणाधिकारी, मुंबई महापालिका



हेही वाचा -

खोटी माहिती देणाऱ्या शाळांविरोधात आता होईल कारवाई

हिंदी, ऊर्दु माध्यमाच्या शाळांमधील पटसंख्या वाढतेय झपाट्याने




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा