Advertisement

बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय कागदोपत्रीच

ज्युनिअर कॉलेजांमधील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीनं हजेरी घेतली जाईल, असा निर्णय शुक्रवारी १५ जून रोजी शिक्षण विभागाने घेतला. मात्र हा निर्णय केवळ कागदोपत्रीच राहिला आहे.

बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय कागदोपत्रीच
SHARES

राज्यातील ज्युनिअर कॉलेजांमधील विज्ञान शाखेचे विद्यार्थी नियमित वर्गांना हजर न राहता फक्त प्रात्यक्षिक वर्गाला हजेरी लावत असल्याच्या अनेक तक्रारी शिक्षण विभागकडे येत होत्या. या सर्व प्रकारांना रोखण्यासाठी ज्युनिअर कॉलेजांमधील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीनं हजेरी घेतली जाईल, असा निर्णय शुक्रवारी १५ जून रोजी शिक्षण विभागाने घेतला. मात्र हा निर्णय केवळ कागदोपत्रीच राहिला आहे. कारण अनेक कॉलेजमध्ये अद्याप बायोमेट्रिक यंत्रणाच बसवण्यात आलेली नाही.


शासन निर्णय काय?

गेल्या काही वर्षांपासून राज्यातील ज्युनिअर कॉलेजांमधील विज्ञान शाखेत शिकणारे अनेक विद्यार्थी नियमित वर्गांना हजेरी न लावता फक्त प्रात्यक्षिक वर्गाला हजेरी लावत होते. याबाबतच्या अनेक तक्रारी शिक्षण विभागाकडे दाखल झाल्यानंतर राज्यातील सर्व खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयंअर्थ सहाय्यित ज्युनिअर कॉलेजांतील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती यापुढे बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यात येईल, असा शासन निर्णय १५ जूनला काढण्यात आला.


एक महिन्याचा अवधी

या निर्णयानुसार २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद या ५ विभागातील सर्व ज्युनिअर कॉलेजांमधील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती 'रिमोट मॉनिटरिंग डिव्हाइस' या उपकरणाद्वारे घेण्याचे आदेश संबंधित कॉलेजांना देण्यात आले होते. त्याशिवाय बायोमेट्रिक उपस्थिती सुरू करण्याकरिता आवश्यक यंत्रसामग्री महिन्याभरात सर्व कॉलेजांनी बसवून त्याचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवण बंधनकारक केलं होतं.


शेवटची सूचना

तरीही जवळपास २ महिन्याचा अवधी उलटत आला तरी देखील मुंबई विभागातील बहुतांश कॉलेजांनी बायोमेट्रिक यंत्रणेचा अहवाल अद्याप शिक्षण विभागाकडं सादर केलेला नाही. विशेष म्हणजे शिक्षण उपसंचालकांनी दोन वेळा सूचना करूनही या कॉलेजांकडून कोणत्याही प्रकारचं उत्तर शिक्षण विभागाला मिळालेलं नाही. तसंच मंगळवारी २१ ऑगस्टला शेवटची सूचना ज्युनिअर कॉलेजांना करण्यात आली आहे. या शेवटच्या सूचनेनंतर आठवड्याभरातच सर्व कॉलेजमध्ये बायोमेट्रीक यंत्रणेची तपासणी करण्यात येणार आहे.


ज्युनिअर कॉलेजामधील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीसंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर अकरावी, एफवाय तसंच इतर शाखांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू असल्यानं आम्हाला कॉलेजमध्ये बायोमेट्रिक हजेरीची यंत्रणा लावता आली नाही. परंतु येत्या २ दिवसांतच आम्ही बायोमेट्रिक हजेरीची यंत्रणा बसवणार आहे.
- टी.पी घुले, प्राचार्या, महर्षी दयानंद कॉलेज


बायोमेट्रिक हजेरीसंदर्भातील निर्णय जाहीर होऊन एक महिन्यानंतर सर्व कॉलेजांना बायोमेट्रिक यंत्रणेच्या अहवालाबाबत विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यावेळी अनेक कॉलेज अकरावी व इतर प्रवेश प्रक्रियेत व्यस्त होते. त्यानंतर शिक्षण उपसंचालकांनी पुन्हा एकदा सर्व कॉलेजांना सूचना केली, मात्र या सूचनेचं पालन करण्यात आलं नाही. अशाप्रकारे जवळपास दोन वेळा बायोमेट्रिक यंत्रणेबाबत सूचना केल्यानंतर अखेर आज मी काॅलेजांना शेवटची सूचना केली आहे. यानंतर आता सर्व कॉलेजांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणेची तपासणी करण्यात येईल.
- राजेंद्र अहिरे, शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग



हेही वाचा-

आता बायोमेट्रि‍क पद्धतीने विद्यार्थ्यांची हजेरी!

महापौर, उपमहापौर वगळता नगरसेवकांची बायोमेट्रिक हजेरी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा