आता बायोमेट्रि‍क पद्धतीने विद्यार्थ्यांची हजेरी!


SHARE

राज्यातील ज्युनिअर महाविद्यालयांमधील विज्ञान शाखेचे विद्यार्थी नियमित वर्गांना हजर न राहता फक्त प्रात्यक्षिकांसाठी वर्गात हजेरी लावत असल्याच्या अनेक तक्रारी शिक्षण विभागकडं येत होत्या. तसंच याबाबत विधिमंडळ सदस्यांनी वेळोवेळी सभागृहात प्रश्नही उपस्थित केले होते. दरम्यान, या सर्व प्रकारांना रोखण्यासाठी ज्युनिअर कॉलेजांतील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रि‍क पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आला.


यामुळे आता इंटिग्रेटेड कॉलेजांच्या मनमानीला चाप बसणार आहे. या संदर्भात युवासेनेनंही आंदोलन करत अशा कॉलेजांवर लक्ष ठेवण्याची मागणी केली होती. दरम्यान, या निर्णयाचे अखिल भारतीय विद्यार्थी सेनेनं स्वागत केलं असून Students Federation of India (एसएफआय) ने याला विरोध दर्शवला आहे.


बायोमेट्रिक हजेरी म्हणजे?

येत्या शैक्षणिक वर्षात बायोमेट्रिक हजेरी पद्धत वापरण्यात येणार असून यासाठी रिमोट मॉनिटरिंग डिव्हाइस या यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. या यंत्रावर एका विशिष्ट ठिकाणी विद्यार्थ्यानी आपले बोट ठेवलं की तो हजर असल्याचं ग्राह्य धरलं जाईल.


असा असणार नवा नियम

राज्यातील सर्व खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयंअर्थ सहाय्यित ज्युनिअर कॉलेजांतील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती यापुढे बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद या पाच विभागांतील सर्व ज्युनिअर कॉलेजांतील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यात येईल.


अहवाल सरकारला देणं बंधनकारक

बायोमेट्रिक उपस्थिती सुरू करण्याकरिता आवश्यक असणारी यंत्रसामग्री येत्या एक महिन्यात ज्युनिअर कॉलेजांनी स्वत: उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे. तसच माध्यमिक संबंधित शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक यांनी सदर ज्युनिअर कॉलेजमध्ये बायोमेट्रिक पद्धत सुरू झाली आहे किंवा कसे याबाबतचा अहवाल सरकारला देणे आवश्यक असणार आहे.


हेही वाचा -

कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक्सनं, मग नगरसेवकांची कधी?

इंटिग्रेटेड संस्थांमध्ये प्रवेश घेऊ नका , शालेय शिक्षण विभागाचं आवाहन

संबंधित विषय
ताज्या बातम्या