मुख्याध्यापकांचा धडा - चीनी वस्तू बाहेर काढा

 Mumbai
मुख्याध्यापकांचा धडा - चीनी वस्तू बाहेर काढा
Mumbai  -  

चिनी हातपंख्याच्या आकाराची वही, अत्तराचा गंध असलेला गोंद, पेन्सिलला लावण्याचं रबरी वेटोळं, फळांच्या कापांच्या आकाराचा खोडरबर आदी शालोपयोगी साहित्य गेल्या काही वर्षांत शाळकरी विद्यार्थ्यांच्या भावविश्वाचा भाग बनून गेल्या होत्या. पण या आणि तत्सम सर्व चिनी बनावटीच्या वस्तू मुंबईतल्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातून हद्दपार होणार आहेत. बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुुख्याध्यापक संघटनेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्य म्हणजे या निर्णयाची नाळ थेट राष्ट्रप्रेमाशी जोडून विद्यार्थी आणि पालकांमध्ये राष्ट्रविचार बिंबवण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे.


चिनी मालाचं भारतीय बाजारपेठेत झालेलं आक्रमण थोपवणं आता अशक्यप्राय होत चाललं आहे. रोजच्या वापरातल्या लहानसहान वस्तूंपासून महागड्या गॅझेटसपर्यंत सर्व बाजारपेठ चिनी मालाने काबीज करून ठेवली आहे. भारत आणि चीन यांच्यातले आधीच ताणलेले संबंध आताशा अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहेत. भारताशी प्रसंगी युद्धासाठी सज्ज होणाऱ्या चीनमधून येणाऱ्या सर्व वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम जोरात सुरू असतानाच मुख्याध्यापक संघटनेने एक संकल्पना अमलात आणण्याची तयारीही सुरू केली आहे. या संकल्पनेनुसार, चिनी बनावटीच्या शालोपयोगी वस्तूंचा वापर टाळण्याचे आवाहन शाळा विद्यार्थी आणि पालकांना करणार आहे. विद्यार्थी आणि पालकांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी हे पाऊल उचलल्याची माहिती मुख्याध्यापकांच्या संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.

शाळांमध्ये चिनी बनावटीच्या वस्तूंचा जास्त वापर केला जातो. कमी मूल्य आणि आकर्षक रंगसंगतीची ही उत्पादनं विद्यार्थ्यांच्या मनाला भुरळ घालतात. या मोहिनीतून बाहेर येत चिनी वस्तूंच्या खरेदीवरच बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. हा विचार केंद्रस्थानी ठेवत चिनी बनावटीच्या कंपासबॉक्स, रंग, वॉटर बॉटल, स्केचपेन, खोडरबर विकत घेऊ नये, असे आवाहन करण्यात येणार आहे.


विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना निर्माण व्हावी, यासाठी ही भूमिका घेण्यात आली आहे. केवळ स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिनी देशप्रेम न दाखवता कायमच आपण देशाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, ही भावना मुलांमध्ये तयार व्हायला हवी. यासाठी चिनी बनावटीच्या शालोपयोगी वस्तूंवर बंदी घालण्याची संकल्पना आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची सक्ती विद्यार्थ्यांवर करणार नाही. या संदर्भात शालेय शिक्षण विभागाशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल.

प्रशांत रेडीजप्रवक्तेमुख्याध्यापक संघटना


हे देखील वाचा - 

चिनी कंपनीवर सरकार मेहरबान?डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments