Advertisement

आयआयटी मुंबईनं तयार केली दांडीयात्रेची शिल्पाकृती

दांडी यात्रेची शिल्पाकृतीतून अनुभूती घेता यावी आणि दांडी यात्रेचा इतिहास जाणून घेता यावा यासाठी मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी दांडी यात्रेची भव्यदिव्य शिल्पाकृती तयार केली आहे.

आयआयटी मुंबईनं तयार केली दांडीयात्रेची शिल्पाकृती
SHARES

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह करून ब्रिटिश साम्राज्याला हादरा दिला होता. या सत्याग्रहासाठी त्यांनी काढलेल्या दांडीयात्रेची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली. याच दांडी यात्रेची शिल्पाकृतीतून अनुभूती घेता यावी आणि दांडी यात्रेचा इतिहास जाणून घेता यावा यासाठी मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी दांडी यात्रेची भव्यदिव्य शिल्पाकृती तयार केली आहे. हीच शिल्पाकृती गुजरातमधील दांडी इथल्या राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारकात ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी एका कार्यक्रमात ही शिल्पाकृती दांडी राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारकात ठेवण्यात आली आहे.


गांधीजींचा १५ फुट उंच पुतळा

पारतंत्र्याच्या काळात ब्रिटीशाविरोधात राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील १९३० सालातील दांडी यात्रा काढण्यात आली होती. २००५ साली दांडीयात्रेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं तत्कालीन पंतप्रधानांनी राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. या स्मारकरात ज्यानी गांधीजींना पाहिले नाही, वाचले नाही, त्यांना या शिल्पांच्या माध्यमातून गांधीजी अनुभवता यावे यासाठी गांधीजीच्या विविध आठवणी,चित्र यात ठेवण्यात आली आहेत. त्यानुसार ही शिल्पाकृती बनवण्याची सुवर्णसंधी मुंबई आयआयटीतील विद्यार्थ्यांना मिळाली आहे. आयआयटी मुंबईच्या प्रा. जुसेर वासी, प्रा. कीर्ती त्रिवेदी आणि त्यांच्या टीममधील विद्यार्थ्यांनी दांडीयात्रेत सहभागी झालेल्या ८१ लोकांचे पुर्णाकृती पुतळे तयार केले आहेत. यात गांधीजीचा ब्राँझचा १५ फूट उंच पुतळाही तयार करण्यात आला असून हा पुतळा मराठमोळे शिल्पकार सदाशिव साठे यांनी घडवला आहे.


स्मारकाला वीज पुरवठा करण्यासाठी सोलार ट्री

त्याशिवाय हे स्मारक पाहायला येणाऱ्या पर्यटकांना मीठ बनवण्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी मिठाच्या कोंड्या बनवण्यात आल्या आहेत. यासाठी आयआयटी मुंबईला धारावीच्या कुंभारवाडय़ातील पारंपरिक कलाकार अब्बास गलावनी यांची मदत केली आहे. तसेच दांडी स्मारकाला वीज पुरवठा करण्यासाठी ४१ सोलार ट्री बनवण्यात आले आहेत. त्यापासून निर्मित वीज ग्रीडद्वारे स्मारकाला पुरवली जाणार आहे. तसेच आयआयटी मुंबईनं स्मारकाची माहिती देण्यासाठी मोबाईल अॅपही बनवले आहे.


आयआयटी मुंबईतील विविध विभागांनी दांडी स्मारकासाठी विविध शिल्पे आणि वास्तू बनवण्यासाठी पुढीलप्रमाणे योगदान दिले आहे.

  • इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर – दांडी यात्रेकरूंची शिल्पे, ४० मीटर उंचीच्या खांबावरील काचेचा भव्य ठोकळा
  • इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग विभाग – स्मारकाला सौरऊर्जा पुरवण्यासाठी सोलार ट्री
  • सिव्हिल इंजिनीयरींग विभाग – कृत्रिम तलाव आणि त्याच्या आसपासची शिल्पकला
  • भौतिकशास्त्र विभाग – काचेच्या भव्य ठोकळय़ाची रोषणाई
  • मटेरियल सायन्स ऍन्ड मेटॅलर्जी विभाग – धुळीमुळे शिल्पे खराब होऊ नयेत म्हणून त्यावर कोटिंग लावणे
  • भूविज्ञान विभाग – स्मारकासाठी वापरलेले दगड, माती यांचा दर्जा आणि टिकाऊपणाची तपासणी

हेही वाचा -

पेंग्विननंतर आता राणीबागेत ३ डी थिएटर

दहावीचं हॉल तिकीट आता ऑनलाइनसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा