Advertisement

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार- वर्षा गायकवाड

राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत स्पष्ट केलं.

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार- वर्षा गायकवाड
SHARES

राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत स्पष्ट केलं. यासंदर्भात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. 

दहावी, बारावीची परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन अशा अनेक प्रश्नांबाबत विद्यार्थी संभ्रमित आहेत. हा विषय अतिशय गंभीर आहे. ऑनलाईन परीक्षा घ्यायची, तर जिथं कनेक्टिव्हिटी नाही अशा दुर्गम भागांचं काय? याबाबत सरकारची काय भूमिका आहे? या प्रश्नी सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी केली होती.

हेही वाचा- अकरावीची प्रवेश प्रक्रिया तूर्त ऑनलाईनच- वर्षा गायकवाड

त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की, दहावी व बारावीच्या परीक्षा हा महत्त्वाचा विषय असून शिक्षण विभागामार्फत याबाबत विविध मुद्यांवर चर्चा केली जात आहे. त्यानुसार या दोन्ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचं ठरविण्यात आलं आहे. दहावीसाठी साधारणत: १६ लाख तर बारावीसाठी १५ लाख विद्यार्थी आहेत. कोरोनामुळे (coronavirus) गेल्यावर्षीचे शैक्षणिक वर्ष अडचणीचे गेलं आहे. अद्यापही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देताना परीक्षा कशा पद्धतीने आणि सुरक्षितपणे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

राज्यातील डोंगराळ भागात ऑनलाईन शिक्षण शक्य नसल्याने मुलं ऑफलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. १०-१२ ची परीक्षा ही बोर्डाची असते. त्यातूनच आपण मेरिट लिस्ट तयार करतो. त्यावरच आधारित ॲडमिशन असतात. त्यामुळे या परीक्षा ऑफलाईनच घ्याव्या लागतील, असंही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी सांगितलं.

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १५ मार्च पासून विविध विषयांसंदर्भात माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितले. अन्य मंडळांच्या परिक्षांच्या तारखा पाहूनच वेळापत्रक केल्याचंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

(maharashtra ssc and hsc exam will be conducted only offline system says varsha gaikwad)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा