Advertisement

दहावीच्या विज्ञानातच चुकीचे 'ज्ञान', भूगोलानंतर याही पुस्तकात चुका!

काही दिवसांपूर्वी भूगोलाच्या पुस्तकात मुंबईपेक्षा दिल्लीत जास्त पाऊस पडतो असे छापण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता दहावीच्या विज्ञान व अन्य काही पुस्तकांतही त्रुटी आढळून आल्या आहेत.

दहावीच्या विज्ञानातच चुकीचे 'ज्ञान', भूगोलानंतर याही पुस्तकात चुका!
SHARES

यंदा दहावीच्या अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून त्यात अनेक समाविष्ट करण्यात आल्या आहेत. मात्र, हे बदल करताना अनेक छोट्या छोट्या बाबींवर दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी भूगोलाच्या पुस्तकात मुंबईपेक्षा दिल्लीत जास्त पाऊस पडतो असे छापण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता दहावीच्या विज्ञान व अन्य काही पुस्तकांतही त्रुटी आढळून आल्या आहेत.


विज्ञानाच्या पुस्तकातील त्रुटी

दहावीच्या नवीन अभ्यासक्रमातील विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २ या पुस्तकात विद्यार्थ्यांना स्त्री व पुरूष प्रजनन संस्थेची ओळख करून देण्यात आली आहे. दरम्यान, ही ओळख करून देताना राज्याच्या शिक्षण मंडळाने काही मुलभूत चुका केल्या आहेत. पुरूषांच्या प्रजनन संस्थेची ओळख करून देताना पु:रस्थ ग्रंथीची प्रत्येकी एक-एक जोडी असल्याचे सांगितले आहे. मात्र, पुरूषांच्या प्रजनन संस्थेमध्ये प्रत्यक्षात ती एकच असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 



तसेच स्त्री प्रजनन संस्थेची ओळख करून देताना त्यात कंद-मूत्रमार्ग ग्रंथीची एक जोडी असते असे म्हटले आहे. मुख्य म्हणजे ही जोडी प्रत्यक्षात स्त्री प्रजनन संस्थेमध्ये नसून पुरूष प्रजनन संस्थेत आढळते. त्यामुळे विज्ञानाच्या पुस्तकात दिलेल्या मजकुरामुळे विद्यार्थ्यांना चुकीचे ज्ञान दिले जाणार आहे.


अन्य पुस्तकांतील चुका

दरम्यान, काही पुस्तकांमध्ये रिकाम्या जागा भरा व जोड्या लावा यांसारख्या प्रश्नांना पर्याय म्हणून शब्दकोडे वापरण्यात आले आहे. तसेच काही प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी जागाच दिली नसल्याचे काही शिक्षकांनी सांगितले आहे. काही पुस्तकांमध्ये स्पेलिंग व भाषांतरच्या अनेक चुका असून या चुकाही शिक्षकांनी लक्षात आणून दिल्या आहेत. तसेच दहावीच्या संरक्षणशास्त्र विषयाच्या पुस्तकातील आपत्ती व्यवस्थापनाच्या धड्यात विविध सुरक्षा चिन्हांची ओळख करुन दिली आहे. दरम्यान, ही ओळख करून देताना 'या चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका', असे मराठी पुस्तकात नमूद केले असून इंग्रजीत भाषांतर करताना 'या चिन्हांकडे दुर्लक्ष करा' असे सांगितले आहे.


'होय, चुका आहेत!'

यासंदर्भात 'मुंबई लाईव्ह'ने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा बसंती रॉय यांना विचारले असता 'दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकात असंख्य चुका असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या चुका लवकरात लवकर दुरूस्त करून अचूक पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल याची खबरदारी राज्याच्या शिक्षण मंडळाने घ्यायला हवी', असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता या सर्व चुका राज्य शिक्षण मंडळ आणि बालभारतीच्या विषयाच्या समिती दुरूस्त करणार का? असा प्रश्न शिक्षणतज्ज्ञांनी विचारला आहे.



हेही वाचा

दहावीच्या पुस्तकात भाजपा, शिवसेनेचं गुणगान


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा