Advertisement

जेईई परीक्षेत मुंबईचा ऋषी अग्रवाल राज्यात पहिला


जेईई परीक्षेत मुंबईचा ऋषी अग्रवाल राज्यात पहिला
SHARES

आयआयटी आणि एनआयटी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल रविवारी १० जून रोजी जाहीर झाला. या परीक्षेत मुंबईच्या परळ येथ राहणाऱ्या ऋषी अग्रवालने ३६० पैकी ३१५ गुण मिळवून देशात आठवा तर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर चंदिगडच्या पंचकुला येथे राहणाऱ्या १७ वर्षीय प्रणव गोयल याने ३३७ गुण मिळवून देशात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. 


मुलींमध्ये कुणी मारली बाजी?

कोटा येथील साहिल जैन देशातून दुसरा आला असून दिल्लीच्या कलश शहाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर मुलींमध्ये कोटा येथे राहणारी मीनल पारेख पहिली आली असून देशातून ती सहावी आली आहे. तिला ३६० पैकी ३१८ गुण मिळाले आहेत. मुंबईतील अभिनव कुमार, आयुष गर्ग आणि निमय गुप्ता या तीन विद्यार्थ्यांनी या परीक्षेत ‘टॉप ५०’ मध्ये स्थान मिळवले.

इतके विद्यार्थी पास

या परीक्षेत देशभरातून १ लाख ५५ हजार १५८ विद्यार्थी बसले होते. त्यातील १८ हजार १३८ विद्यार्थी पास झाले असून १६०६२ विद्यार्थी आणि २०७६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. सर्वसाधारण गटातील ८७९४, ओबीसी प्रवर्गातून ३१४०, अनुसूचित जातींमधून ४७०९ आणि अनुसूचित जमातींमधून १४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.


दिव्यांगामधून प्रथम क्रमांक कुणाचा?

ही परीक्षा देशातील आयआयटी, एनआयटी, आयआयएससी संस्थांमधील प्रवेशसाठी घेतली जाते. ओबीसी प्रवर्गातून विजयवाड्याची मयुरी सिवा कृष्णा मनोहर, एससीमधून कोटा येथील आयुष कदम, एसटीमधून हैदराबादचा जटोथ शिव तरूण यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर दिव्यांगामधून पटियालाच्या मनन गोयलने पहिला क्रमांक मिळवला आहे.

आयआयटी संस्थांमध्ये यंदा ११२७९ जागा उपलब्ध आहेत. यंदा आयआयटी कानपूरने २० मे रोजी जेईई अॅडव्हान्स्ड ही परीक्षा घेतली होती. येत्या १५ जूनपासून त्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. पदवीपूर्व इंजिनियरींग, सायन्स किंवा आर्किटेक्चर अभ्यासक्रमांना हे प्रवेश दिले जातील.

मला मिळालेल्या गुणाबद्दल मी खूप समाधानी आहे. मी सुरुवातीपासूनच अभ्यास करत असल्याने मी नेहमीच अप-टू-डेट राहिलो. हे माझ्या कठोर परिश्रमाचं फळ असून मी कराटे, बॅडमिंटन खेळतो. तसेच स्विमिंग करतो. खेळ आणि अभ्यास यामध्ये मी बॅलन्स राखला होता. मला आयआयटी मुंबईत प्रवेश घेण्याची इच्छा आहे. जेणेकरून मला माझ्या कुटुंबाला नेहमी भेटता येईल.
- ऋषी अग्रवाल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा