Advertisement

कुलगुरू कुठला, मुंबईचा की नागपूरचा?

अंतिम उमेदवारांमधून मुंबई किंवा नागपूरच्या उमेदवाराची निवड होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, हे पद मुंबईच्या वाट्याला द्यावं की नागपूरच्या यावर राज्य सरकार आणि राज्यपालांचे एकमत होत नसल्याने ही घोषणा ताटकळल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कुलगुरू कुठला, मुंबईचा की नागपूरचा?
SHARES
Advertisement

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून नव्या कुलगुरूंचं नाव जाहीर होण्याची सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत. याआधी राज्यपालांनी कुलगुरूंच्या मुलाखती घेतल्या की त्यांचं नाव ताबडतोब जाहीर करण्यात येत होतं. मात्र यंदा १९ तारखेला अंतिम मुलाखती होऊनही नवीन कुलगुरूंच्या नावाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे तर्कविर्तकांना उधाण आलं आहे. नवीन कुलगुरू कुठल्या विभागातील असावा, यावरून खल सुरू असल्यानेच नवीन कुलगुरू निवडीला उशीर होत असल्याचं म्हटलं जात आहे.


एकमत होईना

मुंबई विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूंची निवड करण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने निवड प्रक्रियेनुसार एकूण अर्जांपैकी ३२ जणांना मुलाखतीसाठी बोलाविलं होतं. त्यातून अंतिम ५ उमेदवारांची नावे त्यांनी गेल्याच आठवड्यात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे सुपूर्द केली. या पाचही उमेदवारांनी गुरूवारी राज्यपालांसमोर सादरीकरण केलं. त्यात डॉ. सुहास पेडणेकर आणि डॉ. अनिल कर्णिक (मुंबई), डॉ. प्रमोद येवले (नागपूर), डाॅ. शरद कोंडेकर (जबलपूर), डाॅ. विलास सकपाळ (अमरावती) यांचा समावेश आहे.

या अंतिम उमेदवारांमधून मुंबई किंवा नागपूरच्या उमेदवाराची निवड होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, हे पद मुंबईच्या वाट्याला द्यावं की नागपूरच्या यावर राज्य सरकार आणि राज्यपालांचे एकमत होत नसल्याने ही घोषणा ताटकळल्याची माहिती सूत्रांनी दिली.


सरकारची मर्जी, त्यालाच मिळेच खुर्ची

कुलगुरूपदासाठी पाचपैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. सरकार ज्याचे असते तो आपल्या मर्जीतली व्यक्ती कुलगुरूपदावर बसवतो, असा यापूर्वीचा इतिहास आहे. डॉ. राजन वेळूकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक असल्याने त्यांची मुक्त विद्यापीठावरून थेट मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर वर्णी लागली होती. त्यानंतर निकाल गोंधळामुळे हकालपट्टी झालेले डॉ. संजय देशमुख यांची संघाशी जवळीक असल्याने त्यांना कुलगुरूपदाचा मान मिळाला होता. त्यावरूनच यंदाही सरकारच्या मर्जीतील कुलगुरू होणार, असा अंदाज सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.


कायदेशीर बाजूची तपासणी

यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन कुलगुरूंचं नाव जाहीर केल्यानंतर कोणतीही कायदेशीर अडचण येऊ नये यासाठी सर्व कायदेशीर बाजू तपासल्या जात असून, त्यामुळेच घोषणेला उशीर होत आहे. दरम्यान नागपूर येथील उमेदवाराच्या नावावरून वेगळाच वाद रंगला आहे. तसेच नागपूरच्या उमेदवाराची घोषणा कुलगुरूपदासाठी केल्यास त्याच्या विरोधात न्यायलयीन लढाई लढण्याचा इशारा नागपूर विद्यापीठातील काही प्राध्यापकांनी दिला आहे. दरम्यान, याबाबत 'मुंबई लाइव्ह'ने राजभवनाकडे विचारणा केली असता कोणतीही अधिकृत माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.


सोलापूरचीही मुलाखत पार

मुंबई विद्यापीठाप्रमाणेच सध्या सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आली आहे. शनिवारी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी पात्र उमेदवारांनी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे सादरीकरण केलं. दरम्यान, मुंबई आणि सोलापूर अशा दोन्ही विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नावांची घोषणा एकाच दिवशी होण्याची शक्यता उच्च शिक्षण वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे.हेही वाचा-

कुलगुरुंच्या शर्यतीत ती ५ नावे कुणाची?संबंधित विषय
Advertisement