Advertisement

अखेर विद्यार्थी उच्च न्यायालयात! मुंबई विद्यापीठाविरोधात ३ याचिका


अखेर विद्यार्थी उच्च न्यायालयात! मुंबई विद्यापीठाविरोधात ३ याचिका
SHARES

विधी शाखेच्या तिसऱ्या वर्षांत (एलएलबी) शिकणारे तीन विद्यार्थी अभिषेक भट, सचिन पवार आणि रवीशंकर पांडे यांनी अखेर रखडलेल्या निकालासाठी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. मुंबई विद्यापीठाविरोधात १९ ऑगस्ट रोजी दाखल केलेली त्यांची याचिका न्यायालयाने २२ ऑगस्टला स्वीकारली आहे.

या तिघांव्यतीरिक्त बीकॉम, बीएससी आणि इंजिनीअरिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणखी दोन याचिका न्यायालयात दाखल केल्या आहेत. विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर वेगळी सुनावणी घेण्यात येईल.


मुंबई विद्यापीठ बाजू मांडणार काय?

रखडलेल्या निकालामुळे ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयांत प्रवेश घेणे शक्य झाले नाही, अशा एलएलबीच्या तिसऱ्या वर्षांत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल घोषित करावेत, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी याचिकेद्वारे केली आहे. यावर बाजू मांडण्यासाठी मुंबई विद्यापीठाने सोमवारपर्यंतची मुदत मागितली आहे. परंतु गुरूवारच्या आत विद्यापीठाने बाजू मांडावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

न्या. अनुप मेहता आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेतली. जुलै २०१७ च्या पहिल्या आठवड्यात परीक्षांचा निकाल लागणे अपेक्षित असताना ऑगस्टचा तिसरा आठवडा उलटला तरी निकाल लागलेला नाही.


उच्च शिक्षण रखडले

''आमचा तिसरा याचिकाकर्ता रवीशंकर पांडे याला उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे. परंतु निकालाअभावी तो जाऊ शकत नाही. मला स्वत: 'एलएलएम'साठी प्रवेश घ्यायचा आहे. परंतु मी घेऊ शकत नाही. हिच अवस्था सचिन पवार याचीही आहे. उच्च न्यायालयाने या रखडलेल्या निकालांबाबत निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्च स्तरीय चौकशीचे आदेश द्यावेत,'' अशी मागणी अभिषेक भट याने केली.


वकिलांची मदत घ्या

मुंबई विद्यापीठ पेपर तपासण्यासाठी खूपच वेळ घेत आहे. विद्यापीठाकडे पुरेसे प्रोफेसर नसल्यास त्यांनी वकिलांची पेपर तपासणीसाठी मदत घ्यावी. कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी नवीन कुलगुरूंची नियुक्ती करावी, असेही भट याने स्पष्ट केले.

रखडलेल्या निकालाचा फटका विधी शाखेतील १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना बसला आहे. यांत कनिष्ट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.


प्रवेशाची मुदत वाढवा

दरम्यान, २२ वर्षीय सुद्युम्न नारगोळकर या विद्यार्थ्यानेही बीए, बीकॉम आणि बीएससीचे निकाल लवकर लागावेत म्हणून न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नारगोळकर बीकॉमचे शिक्षण घेत असून त्याला एलएलबीला अॅडमीशन घ्यायचे आहे. परंतु प्रलंबित निकालांमुळे त्याचा प्रवेश अडचणीत आला आहे.

नागरगोळेने एलएलबी प्रवेशासाठी आवश्यक 'कॉमन एन्ट्रन्स टेस्ट' (सीईटी) परीक्षा २३ मे रोजी दिली होती. या परीक्षेत त्याला १५० पैकी १०१ गुण मिळाले. परंतु बीकॉमच्या निकालाअभावी त्याचा प्रवेश रखडला आहे. एलएलबीला अॅडमीशन घेण्यासाठी २४ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे ही मुदत वाढवून ३१ ऑगस्ट करावी, अशी त्याची मागणी आहे.



हे देखील वाचा -

नवी डेडलाईन नाहीच, निकाल लवकरच लागतील - विनोद तावडे

गोपनीय निकालाऐवजी गुणपत्रिका



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा