Advertisement

आता तरी निकाल लावा हो!


आता तरी निकाल लावा हो!
SHARES

निकाल...डेडलाईन...निकाल...गेल्या काही दिवसांपासून मुंबई विद्यापीठात फक्त याच शब्दांची चर्चा सुरु आहे. विद्यापीठाचा अनागोंदी कारभार आणि कुलगुरुंच्या कार्यक्षमतेवर घेण्यात आलेले आक्षेप या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मात्र प्रचंड मानसिक ताणाचा सामना करावा लागत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता निकालासाठी दिलेली 15 ऑगस्टची तिसरी डेडलाईन तरी पाळता यावी यासाठी विद्यापीठ प्रशासन वेगवेगळ्या क्लृप्त्या करताना दिसत आहे. दिवसाला 50 पेपर तपासणाऱ्या शिक्षकांना एक दिवसाचा वाढीव भत्ता(डीए) देण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे.


तारीख पे तारीख!

विद्यापीठाचे रखडलेल्या निकालांचा मुद्दा राज्यपालांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी 31 जुलैपर्यंत निकाल लावण्याची तंबी विद्यापीठ प्रशासनाला दिली. मात्र स्वत: राज्यपालांनी दिलेलीच डेडलाईन विद्यापीठाला पाळता आली नाही. त्यानंतर पुन्हा 5 ऑगस्ट ही डेडलाईन देण्यात आली. मात्र 5 तारखेलाही विद्यापीठाचे पूर्ण निकाल लागू शकले नाही. आता कुलगुरुंनीच 15 ऑगस्ट ही नवीन डेडलाईन दिली आहे.


सुट्ट्या देऊनही निकाल मिळेनात!

राज्यपालांनी दिलेली 31 जुलैची मुदत पाळण्यासाठी विद्यापीठाने आधी चार दिवस आणि नंतर थेट 31 जुलैपर्यंत सुट्टी कॉलेजेसना जाहीर केली. मात्र सुट्ट्या देऊनही विद्यापीठाला निकाल काही लावता आले नाहीत.


आता नवा फंडा!

एवढं करुनही निकाल लागेनात हे लक्षात आल्यानंतर आता पेपर तपासणाऱ्या प्राध्यापकांनाच गाजर दाखवण्याचा प्रयत्न विद्यापीठाने सुरु केला आहे. जे प्राध्यापक दिवसाला 50 पेपर तपासतील, त्यांना एक दिवसाचा वाढीव भत्ता अर्थात डीए देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.


निकाल लागता लागेनात...

मुंबई विद्यापीठाच्या एकूण ४७७ निकालांपैकी आत्तापर्यंत ३०० निकाल जाहीर झाले आहेत.  अजूनही दीडशेहून अधिक निकाल जाहीर होणे बाकी आहेत. दिवसाला सरासरी १० ते १५ निकाल जाहीर केले जात आहेत.


दरम्यान, विद्यापीठाने पुनर्मुल्यांकन आणि छायांकित प्रतीचे शुल्क ५० टक्क्यांनी कमी केले आहे. विद्यार्थ्यांना पुनर्मुल्यांकनासाठी २५० रुपये तर छायांकित प्रतीसाठी ५० रूपये शुल्क भरावे लागणार आहे. ही सर्व प्रक्रिया महाविद्यालयांमार्फत राबवली जाणार आहे. ऑनस्क्रीन मार्किंग पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना उत्तरप्रत्रिकेची डिजिटल इमेज त्यांच्या इमेल वर पाठविण्यात येणार आहे.



हेही वाचा

१५ ऑगस्टनंतर कुलगुरूंना नारळ?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा