Advertisement

मुंबई विद्यापीठातही आता 'प्लास्टिकबंदी’!

प्लास्टिकबंदीचा निर्णय मुंबई विद्यापीठासह संलग्न कॉलेजांमध्येही राबविण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी घेतला आहे. यासंदर्भात लवकरच परिपत्रक काढून सर्व कॉलेजांना याबाबत सूचना करण्यात येणार आहेत. तसंच या कार्याची सुरूवात कुलगुरू कार्यालयापासून करण्याचा निर्धारही सुहास पेडणेकर यांनी केला आहे.

मुंबई विद्यापीठातही आता 'प्लास्टिकबंदी’!
SHARES

राज्य सरकारने राज्यभरात लागू केलेल्या प्लास्टिकबंदीचा निर्णय मुंबई विद्यापीठासह संलग्न कॉलेजांमध्येही राबविण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी घेतला आहे. यासंदर्भात लवकरच परिपत्रक काढून सर्व कॉलेजांना याबाबत सूचना करण्यात येणार आहेत. तसंच या कार्याची सुरूवात कुलगुरू कार्यालयापासून करण्याचा निर्धारही सुहास पेडणेकर यांनी केला आहे.


युवा सेनेचा पुढाकार

राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संपूर्ण राज्यभर प्लास्टिकबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची विद्यापीठ व संलग्न कॉलेजांमध्ये अंमलबजावणी व्हावी यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला असून त्यासंदर्भात युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी कुलगुरूंची भेटही घेतली.


तरूणांना प्रोत्साहीत करण्याची गरज

राज्यात प्लास्टिकबंदी प्रभावीपणे राबवायची असेल, तर त्यासाठी तरुणांना प्रोत्साहीत करण्याची गरज आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व काॅलेजांनी दैनंदिन स्वरूपात प्लास्टिक न वापरता कापडी पिशव्यांचा वापर करावा, तसंच राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) मार्फत विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक न वापरण्याबाबत जनजागृती करावी, अशी मागणीही सिनेट सदस्यांमार्फत करण्यात आली.


प्लास्टिक पर्यावरणास घातक असल्याने सध्या सर्वत्र प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर विद्यापीठ तसेच संलग्न कॉलेजांमध्ये प्लास्टिकबंदी राबविल्यास त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. त्याशिवाय हा स्तुत्य उपक्रमासाठी विद्यापीठासह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी सहकार्य करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे.
- साईनाथ दुर्गे, सिनेट सदस्य, युवासेना


मी स्वत:पासूनच प्लास्टिक बंदी कार्याची सुरूवात केली असून 'नो प्लास्टिक' असंही मी विद्यापीठ प्रशासनाला सांगितलं आहे. तसंच सध्या विद्यापीठात वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या आणि इतर साहित्यही विद्यापीठातून हटविण्यात येणार असून लवकरात लवकर मुंबई विद्यापीठाच्या सर्व कॉलेजही प्लास्टिकमुक्त झालेलं दिसेल.
- डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ



हेही वाचा-

प्लास्टिक बंदीला स्थगिती नाहीच- उच्च न्यायालय

रेल्वे स्टॉल्सवर प्लास्टिक बंदी लागू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा