शिक्षकांची निवडणूक कामातून सुटका

विविध शिक्षक संघटना राज्यातील दहावी बारावी बोर्डाचे काम असणाऱ्या शिक्षकांना निवडणुकाच्या कामातून वगळण्यात यावं यासाठी मागणी करत होते. अखेर निवडणूक आयोगाने शिक्षक संघटनांची मागणी मान्य करत दहावी बारावीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

  • शिक्षकांची निवडणूक कामातून सुटका
SHARE

गेल्या काही दिवसांपासून विविध शिक्षक संघटना राज्यातील दहावी बारावी बोर्डाचे काम असणाऱ्या शिक्षकांना निवडणुकाच्या कामातून वगळण्यात यावं यासाठी मागणी करत होते. अखेर निवडणूक आयोगाने शिक्षक संघटनांची ही मागणी मान्य करत दहावी बारावीच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दहावी बारावीचे निकाल वेळेत लागण्यास मदत होणार आहे.


नेमकं प्रकरण काय ?

सध्या राज्यात दहावी-बारावीची परीक्षा सुरु असून या परीक्षांसाठी नियामक व परीक्षक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांकडे बोर्डाचे पेपर तपासण्याचं काम देण्यात येतं. त्यातच रविवारी निवडणूक आयोगाने लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केलं असून येत्या ११ एप्रिलपासून राज्यात निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरूवात होणार आहे. निवडणुकीचे काम वेळेवर व सुरळीत व्हावे यासाठी निवडणूक आयोगाकडून शिक्षकांना निवडणुकीच्या कामाचे आदेश दिले आहेत. जे शिक्षक प्रशिक्षणाला उपस्थित राहणार नाहीत अशा शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही फर्मान निवडणूक आयोगाने दिले होते.


निकालावर परिणाम

परंतु निवडणुकीच्या कामामध्ये शिक्षकांना २ ते ३ दिवस प्रशिक्षण व निवडणुकीचे काम देण्यात येतं. तर काही शिक्षकांची बोर्डाने परीक्षक व नियामक म्हणून नेमणूक केलेली असते. एका परीक्षकाकडे २५० ते ३०० पेपर तपासण्यासाठी असतात. तर गणित, विज्ञान, इतिहास, भूगोलचे ३०० ते ३५० पेपर असतात. तसंच एका नियामकाकडे १००० ते १२०० पेपरच्या मूल्यांकनाची जबाबदारी असते. हे काम वेळेत पूर्ण झाले नाही तर बोर्डाच्या निकालांवर व मुलांच्या गुणांवर परिणाम होतो.


शिक्षकांची सुटका

यामुळे गेल्या ३ दिवसांपासून भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीसह विविध शिक्षक संघटनांनी दहावी बारावीच्या परीक्षक आणि नियामकाची निवडणुकीच्या कामातून सुटका करावी अशी मागणी करत होते. यानुसार अखेर निवडणूक आयोगाच्या उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी यांनी परिपत्रक काढून बोर्डाचे पेपर तपासणीचे काम करण्याऱ्या शिक्षकांना निवडणुकीची कामे देऊ नयेत व एखाद्या शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली असल्यास ती तात्काळ रद्द करावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या आदेशामुळे अनेक शिक्षकांनी निवडणुकीच्या कामातून सुटकेचा निःश्वास सोडला आहे. या निर्णयामुळे दहावी बारावीची निकाल वेळेत लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.


मुंबईत केंद्र, राज्यशासन, व अन्य वेगवेगळ्या महामंडळात हजारो कर्मचारी असताना नेहमी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामात जुंपण्यात येते. त्यामुळे शिक्षकांच्या कामाकाजावर याचा परिणाम होत असतो. त्याशिवाय यंदा निवडणुका व दहावी बारावी परीक्षांचे निकालाचे काम एकत्रित आल्याने याचा नाहक फटका शिक्षकांना बसतो. त्यामुळे लोकसभेच्या प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामात इतर विभागातील कर्मचाऱ्यांना घ्यावे. 

- अनिल बोरनारे, अध्यक्ष, भाजपा प्रदेश शिक्षक आघाडी मुंबई व कोकण विभाग हेही वाचा -

मोनोरेल स्थानकांवर आता सोलार पॅनल

कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनानंतर फुटणार युतीच्या प्रचाराचा नारळसंबंधित विषय
ताज्या बातम्या