Advertisement

पुनर्मुल्यांकनाचे निकाल रखडलेच!

दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पेपर तपासणीचे काम थांबलं होतं. त्यामुळे पुनर्मुल्यांकनासाठी आलेल्या निकालाचे बारा वाजले आहेत.

पुनर्मुल्यांकनाचे निकाल रखडलेच!
SHARES

आधी गणेशोत्सव त्यानंतर पडलेला मुसळधार पाऊस आणि आता दिवाळीच्या सलग ४ दिवसांच्या सुट्ट्यांमुळे मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा निकाल आणखी रखडला आहे. दिवाळीच्या सुट्टीत पेपर तपासणीचे काम पूर्णपणे थांबल्याने विद्यार्थ्यांनी पुनर्मुल्यांकनासाठी दाखल केलेल्या निकालाचे बारा वाजले आहेत.

      

२६ हजार निकाल प्रतिक्षेत

आधीच ४ महिने रखडलेला निकाल लावल्याचे सोपस्कार पार पाडल्यानंतर विद्यापीठाकडे पुनर्मुल्यांकनासाठी आलेल्या ५० हजाराहून अधिक निकालांचं आव्हान आहे. त्यातच दिवाळीत आलेल्या सलग ४ दिवसांच्या सुट्ट्यांमुळे निकालाचा बट्याबोळ झाला आहे. विद्यापीठाने दिवाळी आधी २४ हजार पुनर्मुल्यांकनाचे निकाल जाहीर केले. मात्र उर्वरीत २६ हजार पुनर्मुल्यांकनाचे निकाल लावायचे बाकी आहेत. 


विद्यार्थ्यांच्या चिंतेत भर

त्यातच दिवाळीनंतर होणाऱ्या सत्रातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यामुळे आपण नेमकी कोणती परीक्षा द्यायची असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये आहे. निकाल जाहीर न झाल्यामुळे 'एटीकेटी'ची परीक्षा द्यायची की पुढच्या सत्रातील परीक्षेची तयारी करायची अशी चिंता विद्यार्थ्यांना सतावत आहे.


'हेल्प डेस्क' बंद

१९ तारखेला जाहीर झालेल्या निकालानंतर विद्यापीठातील 'हेल्प डेस्क' बंद करण्यात आला आहे. 'हेल्प डेस्क' बंद केल्यामुळे आता निकालाबाबत चौकशी कुठे करायची? असा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहे.


विद्यापीठात पुनर्मुल्यांकनाचे निकाल लवकरात लवकर लागावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दिवाळीच्या ४ दिवसांच्या सुट्टयांमुळे पुनर्मुल्यांकनाचे निकाल जाहीर होऊ शकले नाहीत. पुढील सत्रातील परीक्षेअगोदर सर्व निकाल जाहीर होतील. ज्या विद्यार्थ्यांना निकाल मिळाले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी तातडीने विद्यापीठाशी संपर्क साधावा.

- अर्जुन घाटुळे, प्रभारी परीक्षा संचालक



हेही वाचा

विद्यापीठातला हेल्पडेस्क विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखीच!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा