Advertisement

डॉ. संजय देशमुख सक्तीच्या रजेवर, राज्यपालांची नाराजी भोवली


डॉ. संजय देशमुख सक्तीच्या रजेवर, राज्यपालांची नाराजी भोवली
SHARES

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी अखेर सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत विविध शाखांच्या परीक्षांचे निकाल लावण्यात देशमुख अपयशी ठरल्याने राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे. 

देशमुख रजेवर गेल्याने राज्यपाल अर्थात कुलपतींनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे यांच्याकडे मुंबई विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. तर प्रा. धीरेन पटेल यांची प्र कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे. प्रा. धीरेन पटेल सध्या ‘वीरमाता जीजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट’ (व्हिजेटीआय)च्या संचालकपदी आहेत.   

मंगळवारी राज भवनात यासंदर्भात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत प्र कुलगुरु पदासाठी पटेल यांच्या नावावर राज्यपालांनी शिक्कामोर्तब केले. संगणक अभियंता असलेल्या पटेल यांच्या अनुभवामुळे प्रलंबित निकाल लवकर लागण्यास मदत होणार आहे. मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरुपद गेल्या तीन वर्षांपासून रिक्त होते.


रखडलेले निकाल लावण्याचे आव्हान

या दोघांनाही मुंबई विद्यापीठाचा रखडलेला निकाल लावण्याचे आव्हान आता पेलायचे आहे. मार्च/एप्रिलमध्ये झालेल्या मुंबई विद्यापीठातील विविध शाखांच्या परीक्षांचे निकाल अजूनही रखडलेले आहेत. हे निकाल लावण्यासाठी सुरूवातीला ३१ जुलै आणि नंतर ५ ऑगस्टची डेडलाईन राज्यपालांनी कुलगुरूंना दिली होती. 

परंतु ३ लाखांहून अधिक उत्तरपत्रिका तपासण्याचे बाकी असल्याने निकाल लावण्यास १५ ऑगस्ट उजाडेल, असे भाकीत करत डॉ. देशमुख यांनी विद्यार्थी, पालक आणि राजकारण्यांसहित राज्यपालांचीही नाराजी ओढावून घेतली होती. या नाराजीकडे पाहता त्यांची गच्छंती अटळच होती. 


हे देखील वाचा -

१५ ऑगस्टनंतर कुलगुरूंना नारळ?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा