Advertisement

अखेर ठरलं! दहावी भूगोलच्या पेपरला मिळणार ‘इतके’ गुण

भूगोलाच्या पेपरचे गुण देण्यासाठी फाॅर्म्युला ठरवण्यात आला असून यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालाचा मार्गही मोकळा झाला आहे.

अखेर ठरलं! दहावी भूगोलच्या पेपरला मिळणार ‘इतके’ गुण
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लाॅकडाऊनमुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावी भूगोलचा (ssc geography exam mark) पेपर रद्द करण्यात आला हाेता. यामुळे या पेपरचे गुण विद्यार्थ्यांना (SSC students) कसे देणार यावर मागील काही दिवसांपासून विचारविनिमय सुरू होता. त्यानुसार भूगोलाच्या पेपरचे गुण देण्यासाठी फाॅर्म्युला ठरवण्यात आला असून यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालाचा (ssc result) मार्गही मोकळा झाला आहे. 

निकालाचा मार्ग मोकळा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत ३ मार्च ते २३ मार्च २०२० या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली हाेती. परीक्षा अंतिम टप्प्यात आलेली असतानाच कोरोनामुळे दहावीच्या सामाजिक शास्त्र पेपर-२ (भूगोल) आणि दिव्यांग कार्यशिक्षण या परीक्षा रद्द करण्यात आला होता. त्यानंतर पेपर घ्यायचा की थेट गुण द्यायचे, गुण द्यायचे झाल्यास कशा पद्धतीने द्यायचे, असा प्रश्न मंडळाला सतावत होता. यामुळे विद्यार्थ्यांचा निकाल देखील रखडला होता. अखेर या विषयांच्या गुणदानासंदर्भात शिक्षण मंडळाने पर्याय शोधत पत्रक जारी केलं आहे.


‘असा’ आहे फाॅर्म्युला

या पत्रकात नमूद केल्यानुसार,   सामाजिक शास्त्रे पेपर-२ (भूगोल) या विषयाचे गुणदान हे उमेदवाराने दिलेल्या अन्य विषयांच्या लेखी परीक्षेस पात्र केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून, त्याचे रुपांतर परीक्षा रद्द केलेल्या भूगोल विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येईल.

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण या विषयाचे गुणदान त्याने अऩ्य विषयांच्या लेखी,तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत मूल्यमापन/तत्सम परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून, त्याचे रूपांतर परीक्षा रद्द केलेल्या कार्यशिक्षण विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

या विषयांच्या परिक्षेसाठी गुणदान करून निकाल जाहीर करण्यात येईल, असं राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळवलं आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा