Advertisement

ऐतिहासिक! कुलगुरूंना कारणे दाखवा नोटीस


ऐतिहासिक! कुलगुरूंना कारणे दाखवा नोटीस
SHARES

मुंबई विद्यापीठाला निकाल लावण्यासाठी राज्यपालांनी दिलेली ३१ जुलैची डेडलाईन पाळण्यात अपयश आल्याने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांना राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात कुलगुरूंना पहिल्यांदाच कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.

परीक्षांचे निकाल ३१ जुलैपर्यंत लावण्यात विद्यापीठ सपशेल अपयशी झाले. ही डेडलाईन चुकल्यानंतर राज्यपालांनी ५ ऑगस्टची नवी डेडलाईन विद्यापीठाला दिली. ही डेडलाईन पाळण्यातही विद्यापीठाला यश आले नाही. त्यानंतर निकालाची जबाबदारी असतानाही कुलगुरू रजेवर गेले.


कुलपतींना अधिकार

त्यामुळे निकाल रखडवण्यात कारणीभूत ठरलेल्या कुलगुरूंना महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या कलम ११ (१४) आणि ८९ मधील तरतुदींनुसार ही नोटीस पाठवण्यात आली आहे. राज्यपाल कुलगुरूंच्या कामगिरीने खूश नसतील, तर कुलपती म्हणून आपल्या अधिकाराचा वापर करून कुलगुरूंना पदावर काढण्याचा त्यांना अधिकार असतो.

राज्यपालांनी कुलगुरूंबरोबर झालेल्या पहिल्याच बैठकीत सर्व निकाल वेळेवर लावावेत, असे आदेश दिले होते. विद्यापीठाच्या इतिहासात कारणे दाखवा नोटीस मिळणारे हे पहिलेच कुलगुरू आहेत.


आतापर्यंतच्या निकालाचा तपशील:

१२ ऑगस्टपर्यंत केवळ ३२३ निकाल जाहीर झाले आहेत. अद्याप १५० हून अधिक निकाल लागायचे बाकी आहेत. यात आर्ट्स १३१, कॉमर्स १४, विज्ञान २४, मॅनेजमेंट २४, टेक्नॉलॉजी १२९ आणि लॉ च्या एका निकालाचा समावेश आहे.


केवळ पुरवणी तपासून विद्यार्थ्यांना गुण?

निकालाची डेडलाईन दोनदा चुकल्यानंतर १५ ऑगस्टची तिसरी डेडलाईन पाळण्यासाठी विद्यापीठ घाई करत असतानाच या उत्तरपत्रिका नीट न तपासताच निकाल लावला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अनेक विद्यार्थ्यांना केवळ २० ते ३० गुण देऊन त्यांच्यापुढे नापासाचा शेरा देण्यात आला आहे. संपूर्ण उत्तरपत्रिका न तपासता केवळ पुरवणी तपासून विद्यार्थ्यांना गुण दिल्याच्या अनेक तक्रारी विद्यापीठात आल्या आहेत. यात टीवायबीएससीच्या निकालाचा प्रामुख्याने समावेश आहे.


विद्यार्थ्यांचे भवितव्य पणाला

निकाल घाईघाईत लावण्याचे परिणाम विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. केवळ विज्ञान शाखा नाहीतर इतर शाखेतही हाच गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. महाविद्यालयाच्या परीक्षेत चांगले गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्याला बोर्डाच्या परीक्षेत एवढे कमी गुण कसे? हे लक्षात येताच मुंबई विद्यापीठाकडे विचारणा करण्यासाठी महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे धाव घेतली आहे.

उत्तरपत्रिका स्कॅन करताना एक एक पान वेगळे करून स्कॅन केले जाते. वेगवेगळ्या प्राध्यापकांकडून या उत्तरपत्रिका तपासण्यात आल्यामुळे हा गोंधळ झाला असावा, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.



हे देखील वाचा -

160 वर्षांचं मुंबई विद्यापीठ!


 

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा