Advertisement

जम्मू-काश्मीरने सीमा ओलांडली?


जम्मू-काश्मीरने सीमा ओलांडली?
SHARES

दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकातील घोटाळ्यांची मालिकाच सुरू असून भूगोलाच्या पुस्तकात भारताचा नकाशा आणि राष्ट्रध्वज चुकीचा छापण्यात आल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. भारताच्या नकाशातील जम्मू व काश्मीरचा भूभाग देशाच्या सीमेबाहेर दाखवण्यात आला आहे. या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घ्यावी संबंधित व्यक्तींविरोधी गुन्हे दाखल करण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे.


मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

या संपूर्ण प्रकरणाबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं असून, या पत्रात त्यांनी दहावीच्या नवीन पाठ्यपुस्तकातील अनेक गंभीर चुका सांगितल्या आहेत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता दहावीसाठी भूगोलाचं नवीन पाठ्यपुस्तक प्रकाशित केलं आहे.


काय आहेत चुका?

या पाठ्यपुस्तकातील प्रकरण ३ प्राकृतिक रचना व जलप्रणाली यातील पान क्र २४ वर भारताचा नकाशा छापण्यात आला आहे. या नकाशातील जम्मू व काश्मीरचा भाग भारताच्या हद्दीबाहेर सरकल्याचं दिसत आहे. याच विषयाच्या प्रकरण २ मधील स्थान-विस्तार यातील पान क्र ९ वर भारताच्या राष्ट्रध्वजातील अशोक चक्राचा निळा रंग देखील बदलण्यात आलाचा पाटील यांचा दावा आहे.



समिक्षकांचे आक्षेप

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन पुस्तके तयार करण्यात आली असून ही सर्व पुस्तके पाठ्यपुस्तक मंडळाने पुणे येथील समीक्षण सत्रांमध्ये समिक्षकांच्या विचार-विनिमयासाठी ठेवली होती. यावेळी सटाणातील माजी प्राचार्य के. यू. सोनवणे यांनी पुस्तकांबाबत काही लेखी व तोंडी स्वरूपात आक्षेप नोंदवले होते.


दखल न घेताच छपाई

मात्र पाठ्यपुस्तक मंडळाने याची दखल न घेता भारताचा सदोष नकाशा व राष्ट्रध्वज प्रकाशित केला. फक्त नकाशा आणि राष्ट्रध्वजाच्या बाबतीच नव्हे, तर या पुस्तकात आणखीही काही चुका असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. परंतु त्याची दखल न घेता पुस्तकाची छपाई करण्यात आली.


भारताचा सदोष नकाशा आणि राष्ट्रध्वज प्रकाशित करण्यासंदर्भात राज्य सरकारने तातडीने तक्रार दाखल करून दोषींना अटक करावी. तसंच तज्ज्ञांशी चर्चा करून या पुस्तकातील चुका दुरूस्त कराव्या आणि सध्याचं पुस्तक मागे घेऊन नवीन पुस्तक उपलब्ध करून द्यावं.
- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा



हेही वाचा-

इथंही राजकारण! दहावीच्या पुस्तकात भाजपा, शिवसेनेचं गुणगान

पाठ्यपुस्तकांसह उत्तरपत्रिकेतही बदल!

दहावीच्या विज्ञानातच चुकीचे 'ज्ञान', भूगोलानंतर याही पुस्तकात चुका!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा