Advertisement

विशाखा सुभेदार वयोवृद्ध कलाकारांसाठी उभारणार वृद्धाश्रम

विशाखा सुभेदारनं आता वयोवृद्ध कलाकारांसाठी वृद्धाश्रम उभारण्याचा निर्धार केला आहे. विशाखाच्या या स्तुत्य उपक्रमाचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

विशाखा सुभेदार वयोवृद्ध कलाकारांसाठी उभारणार वृद्धाश्रम
SHARES

काही कलाकार आपली कला सादर करत असताना अगदी बेमालूमपणे किंवा कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी न करता समाजकार्य करीत असतात. याच कलाकारांच्या यादीतील एक अभिनेत्री म्हणजेच विशाखा सुभेदार. विशाखानं आता वयोवृद्ध कलाकारांसाठी वृद्धाश्रम उभारण्याचा निर्धार केला आहे. विशाखाच्या या स्तुत्य उपक्रमाचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.


सामाजिक भान

कला आणि सामाजिकता यांना वेगळं करता येत नाही. कलावंत हा कलाकेंद्री असलाच पाहिजे, पण त्याला सामाजिक भानही असायलाच हवं. काही जगावेगळं काम करीत आहोत असा आव न आणता, आपणही समाजाचं काही देणं लागतो या जाणिवेतून अभिनेत्री विशाखा सुभेदारनं एका सामाजिक उपक्रमाची जबाबदारी घेत ५० वर्षांपुढील कलाकारांसाठी 'स्वामीधाम कलाश्रय'च्या निर्मितीचा निश्चय केला आहे.


कलाकारांसाठी वृध्दाश्रम

आपल्या या ध्यासाबद्दल बोलताना विशाखा म्हणाली की, आजवर मी अनेक वयोवृध्द कलाकार वाईट अवस्थेत पाहिले आहेत. कामामधे व्यग्र असल्यानं बऱ्याचदा आपल्याकडून नातेवाईकांशी संबंध ठेवले जात नाहीत. कुंटुंबातील केवळ पोरंबाळं, बायको वगळता तसा जवळचा संबंध कोणाशी उरत नाही. शुटिंगचं युनिटच आपलं कुटुंब होतं. त्यामुळं एकदा वय व्हायला लागलं की आधाराला पटकन कोणी उभं रहात नाही. त्यावेळी आपणच आपला आधार व्हावं असं मनात आलं. अनेक वृद्धाश्रम असूनही कलाकारांसाठी वृध्दाश्रम असावा असं वाटलं आणि त्यातूनच 'स्वामीधाम कलाश्रय'ची कल्पना सुचली. 


दीड एकर जागेत

विशाखाच्या मनात आलेल्या या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी इतरही बऱ्याच समाजसेवी हातांचा आधार लाभला आहे. याबाबत विशाखा म्हणाली की, आमच्या या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी चिंतामणी रहातेकर (काका) यांनी मदतीचा हात पुढे केला. श्री अक्कलकोट स्वामी सेवा मंडळ, अंबरनाथ संचालित स्वामीधाम मोग्रज, आनंदवाडी, कर्जत येथे कलाकार वृद्धाश्रमासाठी दीड एकर जागा दिली आहे. विशेष म्हणजे या संस्थेचे सर्वेसर्वा चिंतामणी रहातेकर यांचा त्याच ठिकाणी स्वत:चा वृद्धाश्रम असूनही केवळ कलेच्या प्रेमापोटी व कलाकारांनाही स्वत:च असं वास्तव्य असावं या आगळ्या कल्पनेकरिता त्यांनी हा मदतीचा हात पुढे केला आहे. 'स्वामीधाम कलाश्रय'साठी रहातेकर यांचा भक्कम पाठिंबा मिळाल्यामुळंच हे पाऊल उचलू शकल्याचं विशाखा म्हणाली.


६ एप्रिलला श्रीगणेशा

श्री स्वामी समर्थांच्या कृपेनं याच ठिकाणी बऱ्याच मान्यवरांच्या उपस्थितीत ६ एप्रिलला अन्नछत्राचं उद्घाटन होणार आहे. त्यावेळीच 'स्वामीधाम कलाश्रय' वृद्धाश्रमाचा श्रीगणेशा करण्यात येणार आहे. हा केवळ वृद्धाश्रम राहणार नाही, तर इथे 'स्वामीधाम कलाश्रय' या नावाला साजेसे अनेक उपक्रम राबवण्याचा मानस आहे. यात नाट्य वर्कशॉप्स, परफॉर्मिंग हॉल, वाचनालय, बागकाम, स्विमिंग पूल, खेळ, विरंगुळा अशा अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे.



हेही वाचा -

राष्ट्रवादीविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार, धनंजय मुंडेंच्या बंगल्याचा गैरवापर

कलाकारांनी तरुणाईला दिला ‘नेशन फर्स्ट’चा संदेश



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा