पर्यावरण रक्षणासाठी मुंबई हायकोर्टानं हिरव्या रंगाचा लेजर फूलस्केप साईज पेपरऐवजी दोन्ही बाजूंनी छापलेले ए ४ आकाराचे पेपर वापरण्याची परवानगी दिली आहे.
सरन्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश एस कुलकर्णी यांच्या खंडपीठानं अॅडव्होकेट अजिंक्य मोहन उदाणे यांच्या बाजूनं केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला. ए४ कागदाचा वापर केल्यामुळे मोठ्या प्रमाणात कागदाची बचत होईल आणि यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे वाचतील, अशी याचिका उदाणे यांनी केली होती.
मुंबई हायकोर्टानं ए४ आकाराचे कागद वापरण्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता हिरव्या रंगाच्या ऐवजी पांढऱ्या ए४ कागदावर याचिका, अर्ज आणि प्रतिज्ञापत्र दाखल करता येणार आहेत. पांढऱ्या रंगाच्या ए४ कागदावर दोन्ही बाजूला मजकूर छापता येणार आहे.
वकील असणाऱ्या अजिंक्य उदाने यांनी न्यायालयिन आणि प्रशासकिय कामासाठी हिरव्या रंगाऐवजी ए४ आकाराचे कागद वापरण्यात यावे अशी मागणी करत याचिका दाखल केली होती. याचिकेत दावा करण्यात आला होता की, ए४ आकाराच्या पेपरमुळे मोठ्या प्रमाणात कागदाची बचत होते. तसेच यामुळे पर्यावरण रक्षणालादेखील हातभार लागेल.
दरम्यान, कोर्टानं चांगल्या गुणवत्तेचे (७५ जीएसएम) ए४ आकाराचे कागद वापरण्याची अधिसूचना काढली आहे. या कागदांच्या दोन्ही बाजूला छापण्यास परवानगी देण्यात आली आहे. हायकोर्टाकडून जारी करण्यात आलेला हा आदेश राज्यातील सर्व कोर्टांमध्ये लागू करण्यात येणार आहे.
हेही वाचा