Advertisement

मेट्रो कारशेडसाठी रातोरात कापली आरेतील झाडं, स्थानिक आणि पर्यावरणप्रेमी आक्रमक

हायकोर्टानं मेट्रोच्या बाजूनं दिलेल्या निकालानंतर पर्यावरणप्रेमींना आणखी एक धक्का बसला आहे. शुक्रवारी निकाल आल्यानंतर लगेचच संध्याकाळी झाडे तोडायला सुरुवात करण्यात आली. स्थानिकांनी याचा तीव्र विरोध केला आहे.

मेट्रो कारशेडसाठी रातोरात कापली आरेतील झाडं, स्थानिक आणि पर्यावरणप्रेमी आक्रमक
SHARES

मेट्रो  ३ च्या कारशेडसाठी गोरेगाव पूर्वेकडील आरे काॅलनीतील झाडे तोडण्यावरून मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेला खटला पर्यावरणप्रेमींच्या विरोधात जाताच मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन लिमिटेडनं काळोख्या रात्रीचा फायदा उचलत झाडांच्या कत्तलीला सुरूवात केली. याची खबर पर्यावरणप्रेमींपर्यंत पोहोचताच, शेकडो पर्यावरणप्रेमींनी आरेत गोळा होऊन ‘एमएमआरसी’च्या वृक्ष कत्तलीला जोरदार विरोध केला. यावेळी उपस्थित पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची देखील झाली.

हायकोर्टाचा निर्णय

मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने मेट्रो  ३ च्या कारशेडसाठी आरे काॅलनीतील २७०० झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने या सर्वही याचिका फेटाळून लावल्या. आरेतील कारशेड मेट्रोसाठी आवश्यक असल्याचं व आरे हे जंगल नसल्याचे प्रशासनाचं म्हणणं न्यायालयानं ग्राह्य ठरवलं आणि वृक्षप्राधिकरणाचा झाडे तोडण्यास परवानगी देण्याचा निर्णय योग्य असल्याचा निवाडा देत याचिका फेटाळून लावल्या. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई मेट्रो-३ प्रकल्पाला यामुळे मोठा दिलासा मिळाला. तर पर्यावरणप्रेमी 'आरे' आंदोलकांना मोठा धक्का बसला. 

नेमकं प्रकरण काय?

निकाल आल्यानंतर लगेचच संध्याकाळी ६-७ वाजण्याच्या सुमारास एमएमआरसीने तातडीने पावलं उचलत रात्रीच्या काळोखातच झाडांच्या कत्तलीला सुरूवात केली. अंदाजे २०० हून अधिक झाडं एमएमआरसीने कापल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप आहे. झाडे कापतानाचा आवाज स्थानिकांपर्यंत पोहोचला. आवाज ऐकून मोठ्या संख्येनं स्थानिकांनी आरेत  गर्दी केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून आरेमध्ये झाडे कापतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. यानंतर मुंबईकरांनी देखील आरेतल्या मेट्रो कारशेडच्या ठिकाणी धाव घेतली. या दरम्यान पोलीस आणि स्थानिकांमध्ये बाचाबाची देखील झाली. 

पर्यावरणप्रेमींनी आरेत गोळा होत या कत्तलीला जोरदार विरोध सुरू केला. याप्रकरणी पर्यावरणप्रेमी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. असं असताना अपीलाची मुदत संपण्याआधीच झाडांच्या कत्तलीला सुरूवात केल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप आहे.

सुर्यास्त झाल्यानंतर झाडे कापू नाही शकत हा पालिकेचाच नियम आहे. पण नियम तोडण्यात आला आहे. हायकोर्टानं आज निर्णय दिल्यानंतर काही दिवसांचा कालावधी आमच्याकडे आहे. या कालावधीत आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो. पण त्याआधीच झाडं कापण्यात आली.

निमिश मलडे


स्थानिक संतप्त

वृक्ष प्राधिकरणानं महानगरपालिकेच्या वेबसाइटवर ४ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ च्या सुमारास आदेशाची प्रत अपलोड केली होती. पण हायकोर्टानं दिलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. पण एमएमआरसीएलनं त्याआधीच झाडे कापायला सुरुवात केली, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

"एफआयआर दाखल करणार"

झाडे तोडली जाऊ नये यासाठी कारशेडच्या आत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी झाडे कापण्यासंदर्भातील परवानगी पत्र मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना कोणतेही अधिकृत कागदपत्र दाखवण्यात आले नाही. जवळपास २०० च्या आसपास झाडे तोडण्यात आली. आम्ही आता झाडे कापणाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करणार आहोत.

आकाश भोईर, स्थानिक


प्रकरण चिघळण्याची शक्यता

मेट्रो कारशेडमध्ये होणाऱ्या वृक्ष तोडीचा विरोध करणाऱ्या स्थानिकांना आणि पर्यावरण प्रेमींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सध्या परिस्थिती पाहता येत्या काळात हे प्रकरण चांगलंच तापणार आहे.


‘आरे’ कारशेडचा मार्ग मोकळा, हायकोर्टाने फेटाळल्या सर्व याचिका

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा