Advertisement

खारमध्ये झाडांची अवैध कत्तल?


खारमध्ये झाडांची अवैध कत्तल?
SHARES

खार - पालिकेच्या एका कंत्राटदाराकडून खार सबवेजवळ बेकायदेशीररित्या झाडांची कत्तल केली जात आहे. ही माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते आणि मेट्रो-3 मधील झाडांच्या कत्तलीविरोधातील याचिकाकर्ते झोरू बाथेना यांनी दिली आहे. पालिकेच्या या कंत्राटदाराकडे तीन झाडांच्या केवळ छाटणीची परवानगी असताना कंत्राटदाराकडून चक्क एक झाड कापण्यात आल्याचे सांगत बाथेना यांनी या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.

मंगळवारी, 21 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता खार सबवे जवळील एका रस्त्यावर झाड कापले जात असल्याचे बाथेना यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी कंत्राटदाराकडे झाड कापण्याबाबतची परवानगी आहे का याची विचारणा केली. तेव्हा रस्त्याच्या कामात हे झाड अडथळा ठरत असल्याचे सांगत तेथील कर्मचाऱ्यांनी परवानगीचे पत्र दाखवले. पण ही परवानगी झाड कापण्यासाठीची नव्हती तर येथील तीन झाडांच्या फांद्याची छाटणी करण्यासंबंधीची एच पूर्व विभागाची परवानगी होती. त्यामुळे बाथेना यांनी त्वरीत कंत्राटदाराशी संपर्क साधत झाड कापण्याचे काम थांबवले खरे, पण त्याआधीच तीन पैकी एका झाडाची कत्तल झाली होती.

झाड कापण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असते. मात्र ही परवानगी नसतानाही, केवळ फांद्या छाटणीसाठी परवानगी असताना कंत्राटदार मनमानीपणे कसे झाडांची बेकायदा कत्तल करत आहेत याचे धक्कादायक वास्तव यातून समोर आले आहे. दरम्यान याविषयी आता लवकरच स्थानिक पोलीस ठाण्यात संबंधित कंत्राटदाराविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तर पालिका आणि वृक्ष प्राधिकरणाकडेही यासंबंधीची तक्रार दाखल करणार असल्याचेही बाथेना यांनी स्पष्ट केले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा