Advertisement

'अमृतयोग'च्या माध्यमातून दिग्गजांना मानाचा मुजरा!

वाल्मिकी ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगूळकर, अष्टपैलू लेखक 'महाराष्ट्र भूषण' पु. ल. देशपांडे आणि संगीतकार सुधीर फडके या तीन दिग्गजांना मानाचा मुजरा करणारा 'अमृतयोग' हा कार्यक्रम छोट्या पडद्यावर सादर केला जाणार आहे.

'अमृतयोग'च्या माध्यमातून दिग्गजांना मानाचा मुजरा!
SHARES

महाराष्ट्राला विविध कला, संस्कृती आणि साहित्याचा दैदीप्यमान वारसा लाभला आहे. या परंपरेत अग्रणी असलेले साहित्य आणि संगीताच्या प्रांतातील दिग्गज म्हणजेच महाराष्ट्राचे वाल्मिकी ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगूळकर, अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसविणारे अष्टपैलू लेखक 'महाराष्ट्र भूषण' पु. ल. देशपांडे आणि मराठी माणसाच्या हृदयावर सुरांनी आपलं नाव कोरणारे 'बाबूजी' म्हणजेच लाडके संगीतकार सुधीर फडके... या तीन दिग्गजांना मानाचा मुजरा करणारा 'अमृतयोग' हा कार्यक्रम छोट्या पडद्यावर सादर केला जाणार आहे.


मानाचा मुजरा –अमृतयोग

पुलं, गदीमा आणि बाबूजी या त्रयींनी आपल्या प्रतिभेनं महाराष्ट्रात आपलं युग निर्माण केलं आणि कित्येक दशकं मराठी मनावर अधिराज्य गाजवलं. महाराष्ट्रातील या तिन्ही सारस्वतांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मानवंदना देण्यासाठी कलर्स मराठीनं 'मानाचा मुजरा –अमृतयोग' या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमातून साहित्य, संगीत आणि सुरांची मैफल अनुभवण्याची सुवर्णसंधी रसिकांना मिळणार आहे.  गीत, संगीत, नाट्य आणि नृत्याविष्काराची ही अनोखी मैफल रविवारी ७ एप्रिल रोजी पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा स्वरूपात कलर्स मराठीवर प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पृहा जोशी आणि सुमीत राघवन यांनी केलं आहे.


अजरामर गाणी

ग. दि. माडगूळकर यांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि अल्पावधीत अनभिषिक्त सम्राटपद मिळवलं. ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांनी मिळून मराठी चित्रसृष्टीत आपले एक युग निर्माण केलं. त्या दोघांची अनेक अजरामर गीते 'मानाचा मुजरा –अमृतयोग'मध्ये रसिकांना पुन्हा अनुभवता येतील. राहुल देशपांडे यांनी 'कानडा राजा पंढरीचा...' आणि 'शब्दावाचून कळले सारे...' या गाण्यांसोबतच हृषिकेश रानडेनं 'ऊठ पंढरीच्या राजा...'  हे गाणं सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केलं. यासोबतच गायक-संगीतकार अजित परबनंही बाबूजींची काही अजरामर गाणी सादर केली. 


लावणी खास शैलीत

'मुंबईचा जावई' या चित्रपटातील 'आज कुणीतरी यावे...' हे गाणं 'सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर' या कार्यक्रमातील शरयू दाते हिनं सादर केलं. 'त्या तिथे पलीकडे...' हे भावगीत गायनात स्वत:चा अनोखा ठसा उमटवलेल्या मालती पांडे बर्वे यांची नात म्हणजेच प्रियांका बर्वे हिनं सादर केलं. 'सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर' या पर्वाची विजेती स्वराली जाधवनं 'फड सांभाळ...' ही लावणी आपल्या खास शैलीत सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. याच शोमधील चैतन्य देवढे आणि सई जोशी यांनीही सुंदर गाणी सादर केली. 


नाट्यप्रवेश सादर

साक्षात पुलं साकारण्यासाठी अतुल परचुरे आणि आनंद इंगळे यांनी त्यांचे नाट्यप्रवेश सादर केले. सोनिया परचुरे आणि नकुल घाणेकर यांनी गीतरामायणातील निवडक गाणी नृत्यबद्ध केली. या कार्यक्रमामध्ये ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके आणि पु. ल. देशपांडे यांच्याबद्दलच्या आठवणी, किस्से त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी म्हणजेच शरतकुमार माडगूळकर, श्रीधर फडके, ज्येष्ठ नेते शरद पवार, ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलीन वादक पं. प्रभाकर जोग, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, अभिनेते सचिन पिळगावकर या मान्यवरांनी जागवल्या आहेत.हेही वाचा -

अफवा, खोट्या बातम्या, माहिती टाळण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपची ‘टिपलाइन’ सुविधा

आचारसंहितेमुळं मांजरांची नसबंदी लांबणीवरसंबंधित विषय
Advertisement