Advertisement

हे सरकार सावरकरांचे स्वप्न साकार करेल - तरुण विजय


हे सरकार सावरकरांचे स्वप्न साकार करेल - तरुण विजय
SHARES

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार ध्यानात ठेवून हे सरकार त्यांचे स्वप्न साकार करेल असा विश्वास माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार तरुण विजय यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 134 व्या जयंती सोहळ्यानिमित्त ते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर बोलत होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने शौर्य पुरस्कार नायक पांडुरंग गावडे यांना तर विज्ञान पुरस्कार जितेंद्र जाधव यांना प्रदान करण्यात आला.

ज्यावेळी राष्ट्रभक्तीची चर्चा होईल, त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्थान सर्वोच्च असेल. बाल्यावस्थेत त्यांनी शिवरायांची आरती रचली, ती आजदेखील त्यांच्या राष्ट्रभक्तीच्या विचारांची भावना किती प्रबळ आणि प्रखर होती, याची साक्ष देते. त्यामुळे त्यांच्या विचारांना आपण ध्यानात घेतले पाहिजे. आज सैन्यावर दगडफेक करणाऱ्यांच्या समर्थनार्थ लिहणाऱ्या लेखण्यांनी हे विचारात घ्यावे. तसेच या महापुरूषांच्या नावे असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला राष्ट्रीय तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, असे विचार देखील तरुण विजय यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार सर्वदूर नेण्यासाठी स्मारकाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून, त्याची व्याप्ती येणाऱ्या काळात अधिकाधिक विस्तारीत होईल. तसेच देशाच्या अखंडता आणि एकात्मतेला पोषक वातावरणनिर्मिती त्यातून स्मारकाच्या वतीने केली जाईल, असे विचार अध्यक्षीय भाषणात स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना जितेंद्र जाधव यांनी 'भारतमातेची सेवा हीच ईश्वरसेवा' हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विचार लहानपणीच आपल्या मनावर बिंबवला गेला असल्यामुळे आपण देशरक्षणार्थ सेवेसाठी प्रोत्साहित झाल्याचे सांगितले. त्याचबरोबर आपण आपल्या स्वदेशी बनावटीच्या माध्यमातून त्यांच्या विचारांनुसार आपण अधिक प्रभावीपणे आणि प्रबळपणे शस्त्रसज्ज होऊ शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे तसेच सावरकरभक्त आणि देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लोणीशिल्प साकारणारे शेफ भूषण चिखलकर, जितेंद्र काळे आणि रोहन खंडागळे यांचा सत्कार करण्यात आला. तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रसार करणारे आणि आनंदवारी ब्लॉगनिर्मिती केलेले आनंद शिंदे यांना देखील सन्मानित करण्यात आले.


हेही वाचा - 

बटरपासून साकारले सावरकरांचे शिल्प!

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जाज्वल्य पत्रकारिता

'टीका करणाऱ्यांनी आधी सावरकर साहित्य वाचावे'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा