Advertisement

Ashadhi Ekadashi : मुंबईतील 'पंढरी'! आषाढी एकादशीला 'या' 5 मंदिरांना भेट द्या

तुमचीही यंदाची वारी चुकली असेल तर मुंबईच्या पंढरीला जाऊन तुम्हाला दर्शन घेता येईल. मुंबईत या 5 ठिकाणी आषाढी एकादशी दणक्यात साजरी केली जाते.

Ashadhi Ekadashi : मुंबईतील 'पंढरी'! आषाढी एकादशीला 'या' 5 मंदिरांना भेट द्या
SHARES

आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहाते ते विठ्ठलाचे रूप. आज आषाढी एकादशी निमित्त अनेक जण वारीला जातात. पण प्रत्येकाला पंढरीला जाणे शक्य होत नाही. तुमचीही यंदाची वारी चुकली असेल तर मुंबईच्या पंढरीला जाऊन तुम्हाला दर्शन घेता येईल. मुंबईत या 5 ठिकाणी आषाढी एकादशी दणक्यात साजरी केली जाते. 

१) विठ्ठल रखुमाई मंदिर, वडाळा

हे मंदिर सुमारे ४०० वर्ष जुने आहे. या मंदिराने वडाळ्याला नवी ओळख दिली आहे. या मंदिराला प्रति पंढरपूर असेही म्हणतात. एकेकाळी मुंबईतील सात बैटांपैकी एक बेट म्हणून ओळखले जाणारे आणि मिठागरांसाठी ओळखला जाणारा वड्याळाचा हा भाग. एकदा मिठागरांत काम करताना कामगारांना या ठिकाणी विठ्ठल रखुमाईची मूर्ती सापडली. आणि नंतर या ठिकाणी मंदिर स्थापन करण्यात आले. एकादशीच्या दिवशी या ठिकाणी मेळावाही भरतो.

पत्ता - हे मंदिर वडाळा बस डेपोजवळ, सेंट्रल रेल्वे कॉलनी, कात्रज रोड वडाळा येथे आहे.

२) विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट, माहीम

माहीम येथील विठ्ठल रखुमाईचे मंदिर हे ९६ वर्ष जुनं असून १९१६ साली बांधण्यात आले. १९१४-१५ साली माहीमध्ये प्लेगची साथ पसरली असता एका व्यक्तीने या विभागात विठ्ठल रखुमाईचे मंदिर स्थापन करण्यास सांगितले. या मंदिरात प्रवेश करताच गणेशाची, गरुडाची मूर्ती नजरेस पडते.

पत्ता - हे मंदिर मोरी रोड पोस्ट ऑफिसच्या समोर, माहीम फाटक जवळ आहे.

३) विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट, सायन

हे मंदिर १२५ वर्ष जुने आहे. येथे विठ्ठल रखुमाईच्या मंदिराची स्थापना ही १८९३ साली करण्यात आली होती. अशी आख्यायिका आहे की श्री दामोदर खरे महाराज हे १८६० साली मुंबईत आले व शिवगावात स्थित झाले. एकदा ते पंढरीत गेले असता तेथील सोहळा बघून प्रभावित झाले. घरी परतताना त्यांची धामूर्ती आणल्या, या मूर्ती चोरीला जाऊ नये म्हणून त्यांनी विठ्ठल रखुमाईच्या पाषाण मूर्ती घरात ठेवल्या. नंतर तेथील स्थानिकांच्या आग्रहा खातर या मंदिराची स्थापना करण्यात आली. या मंदिराची खासियत अशी आहे की, सणानुसार येथील विठ्ठल रखुमाईची वेशभूषा बदलली जाते.

पत्ता - हे मंदिर आशिर्वाद अपार्टमेंट, लक्ष्मीबाई केळकर मार्ग, सायन मेन रोड, सायन फ्लायओव्हर जवळ सायन येथे आहे.

४) विठ्ठल रखुमाई मंदिर, विलेपार्ले

विलेपार्ले येथील मंदिर ८१ वर्ष जुने असून १९३५ साली या विठ्ठल रखुमाई मंदिराची स्थापना करण्यात आली होती. हे मंदिर लक्ष्मीदास गोकुळदास तेजपाल यांच्या मुलीच्या जन्मदिनानिमित्त बांधले असे म्हटले जाते. मंदिरात प्रवेश करताच त्याबद्दल थोडक्यात माहीती देणारा शिलालेख नजरेस पडतो. या मंदिरात विठ्ठल रखुमाईसोबत संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरवरांचे फोटो देखील आहे. (Ashadhi Wari)

पत्ता - हे मंदिर तेजपाल स्कीम रोड, विलेपार्ले (पूर्व) येथे आहे.

५) विठ्ठल रखुमाई मंदिर, बोरिवली

हे मंदिर ३३ वर्ष जुनं असून १९८० साली याची स्थापना झाली. या मंदिराच्या इतिहासाबद्दल एक कथा आहे. विठ्ठलभक्त उत्तेकर यांना खुद्द विठुरायानं स्वप्नात येऊन अनुग्रह दिला. या साक्षात्कारानंतर त्यांनी मंदिराच्या ठिकाणी विठ्ठल रखुमाई मूर्तीची स्थापना केली. स्थानिक विठ्ठल भाविकांनी त्यांना मंदिर उभारण्यास हातभार लावला.

२००१ साली या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. आषाढी एकादशी निमित्त मंदिरात ३ दिवस उत्सव साजरा केला. या महोत्सवात किर्तनकारांचे किर्तन आयोजित केले जाते. मंदिरात सकाळी ४ वाजता काकड आरती, सायंकाळी ३ ते ५ वाजता महिला मंडळांचे भजन आणि ७ ते ८ वाजता विठ्ठलाची शेजारती होते. मंदिरातील विठ्ठल रखुमाईची मूर्ती ही नवसाला पावणारी आहे, असा भाविकांचा समज आहे.



हेही वाचा

आषाढी एकादशीनिमित्त जाणून घ्या तुळशीचं महत्त्व

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा