गणेशोत्सव २०१९: गणपती बाप्पाची मिरवणूक यंदा लांबणार

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाच्या आगनम आणि विसर्जनावेळी कमकुवत, जर्जर झालेल्या पुलांवर नाचू नये, अशा सूचना मुंबई महापालिका प्रशासनानं गणेश मंडळांना दिल्या आहेत.

  • गणेशोत्सव २०१९: गणपती बाप्पाची मिरवणूक यंदा लांबणार
SHARE

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाच्या आगमन आणि विसर्जनावेळी कमकुवत, जर्जर झालेल्या पुलांवर नाचू नये, अशा सूचना मुंबई महापालिका प्रशासनानं गणेश मंडळांना दिल्या आहेत. मिरवणुकीत नाच-गाण्यांमुळं दाब येऊन पुलांचं आणखी नुकसान होऊ शकतं. त्यामुळं गणेश भक्तांनी सावधानता बाळगून पुलावर जास्त वेळ रेंगाळू नये, त्यांनी शांतपणं लवकरात लवकर पूल पार करावा, असं आवाहनही पालिकेनं केलं आहे. मुंबईत मागील काही काळात पूल कोसळून जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय अनेक पूल धोकादायक असल्यानं बंद केले आहेत. त्यामुळे गणेश मंडळांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. परिणामी यामुळं बाप्पाची मिरवणूक लांबणार आहे.

कमकुवत पूल

मुंबईतील लालबाग परिसरात अनेक कारखाने आहेत. या कारखान्यांमधून मुंबईसह उपनगरात मुर्त्या नेल्या जातात. यावेळी बहुतेक गणेश मंडळं चिंचपोकळी, करीरोड आणि एल्फिन्स्टन पुलाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. परंतू, हे पूल कमकुवत झाल्यानं गणेश मंडळांनी या पुलांवरून मिरवणूक लवकर न्यावी, असं महापालिकेनं आवाहन केलं आहे. मात्र, मुंबईतील अनेक गणेश मंडळांना लोअर परळचा पूल बंद असल्यानं पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळं गणेश मंडळांचा वेळ वाया जात असून, त्यांना मोठी कसरत करत बाप्पाची मूर्ती मंडळात न्यावी लागत आहे.

खड्ड्यांचा धोका

पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आले असले तरी रस्त्यांवरील खड्ड्यांचा गणेश मंडळांना धोका आहे. कारण बऱ्याच मंडळांच्या मुर्त्या या १६ ते १८ फूटांपेक्षा जास्त उंच असतात. त्यामुळं रस्त्यांवरील खड्ड्यांमुळं मंडळांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा पालिका आणि संबंधित यंत्रणांकडं तक्रारी करूनही खड्डे न बुजवल्यानं गणेश मंडळ नाराजी व्यक्त करत आहेत.

उंची मर्यादीत असावी

कमकुवक झालेले पूल, पर्यायी मार्ग आणि गणपतीची उंची याबाबत मुंबई लाइव्हनं मुंबईतील काही गणेश मंडळांचं मत जाणून घेतलं. त्यावेळी त्यांनी गणपतीच्या मुर्तीची उंची मर्यादीत असावी, उंचीबाबत स्पर्धा करू नये असं मत व्यक्त केलं. पूल आणि पर्यायी मार्गाबद्दल विचारलं असता, कमकुवत पुलामुळं लालबाग परिसरातून दक्षिण मुंबईत जाणाऱ्या गणेश मंडळांना मोठा फटका बसणार आहे. तसंच, पर्यायी मार्गामुळं वाहतूक कोंडी निर्माण होऊन आगमन आणि विसर्जन मिरवणुकीला विलंब होणार असल्याचं मंडळांनी म्हटलं आहे. 



हेही वाचा -

गणेशोत्सव २०१९: अग्निशमन दलाचं लालबागच्या राजाला १७ लाखांचं बिल

गणेशोत्सव २०१९ : जाणून घ्या गणेशोत्सवाची अपडेट बातमी मुंबई लाइव्हवर



संबंधित विषय
ताज्या बातम्या