Advertisement

यावर्षी मुंबईतही शाडूच्या मातीचे गणपती!

अंधेरी आणि जोगेश्वरी भागांतील जवळपास १२ मूर्तिकारांना एकूण ८०० गोणी कच्चा माल (शाडूची माती) पुरवण्यात आला आहे.

यावर्षी मुंबईतही शाडूच्या मातीचे गणपती!
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं घेतला. त्याचप्रमाणं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची नियमावली जाहीर झाली. या सगळ्याच्या पार्श्वभूमीनंतर मुंबईत शाडूच्या मातीची गणपतीची मूर्ती घडविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, मूर्तिकार संघानं शाडू मातीच्या मूर्तींबाबत पुढाकार घेत मुंबईत शाडू मातीची उपलब्ध करून दिल्यानं मूर्तिकारांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. शाडू मातीचा पहिला टेम्पो शनिवारी, मुंबईत दाखल झाला. पहिल्या खेपेत अंधेरी आणि जोगेश्वरी भागांतील जवळपास १२ मूर्तिकारांना एकूण ८०० गोणी कच्चा माल (शाडूची माती) पुरवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आणखी ४ फेऱ्यांमध्ये अधिकाधिक मूर्तिकारांपर्यंत माती पोहोचवण्यात येणार असून, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना घरातच मूर्ती घडवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मूर्ती केवळ ११, १५, १८, २१ इंच उंचीच्या असणार असल्याचं मूर्तिकार संघातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. शाडू मातीच्या मूर्ती तयार करा, अशा सूचना केंद्राकडून देण्यात आल्या. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या मातीच्या उपलब्धतेबाबत केंद्र वा राज्य सरकारकडून पुढाकार घेतला जात नव्हता. अखेर मूर्तिकार संघानं माती आणण्याबाबत पुढाकार घेतला.

गणपतीची मूर्ती तयार करण्यासाठी लागणारी माती ही गुजरातहून आणण्यात आली असून, गणपती मूर्तीसाठी वापरण्यात येणारी माती असल्यानं राज्यात येताना कुठल्याही तपासणी नाक्यावर टेम्पो अडवण्यात आला नाही. मात्र, राज्य शासनानं जातीनं लक्ष घालून ही माती मूर्तिकारांना उपलब्ध करायला हवी, अशी विनंती मूर्तिकार संघाकडून करण्यात आली. पहिल्या फेरीत १२ मूर्तिकारांना माती पुरवण्यात आली आहे. तसेच पुढच्या चार फेऱ्यांमध्ये जवळपास एक लाख २८ हजार किलो शाडूची माती मुंबईत आणली जाणार आहे. ज्या विभागामध्ये टेम्पो नेण्याचे नियोजन आहे तेथील स्थानिक पोलिस ठाण्यात त्याची माहिती दिली जात आहे. 



हेही वाचा -

बेस्टचा आंदोलनाचा इशारा, अत्यावश्यक सेवेवर परिणाम होण्याची शक्यता

२ लाख श्रमिकांना एसटीचा आधार!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा