Advertisement

फटाके फोडण्यावर काय म्हणताहेत क्रीडापटू? वाचा...


फटाके फोडण्यावर काय म्हणताहेत क्रीडापटू? वाचा...
SHARES

दिल्लीपाठेपाठ महाराष्ट्र सरकार देखील फटाक्यांवर बंदी घालण्याचा विचार करत असल्याचं वक्तव्य पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी काही दिवसांपूर्वी केलं. मात्र त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होताच त्यांनी या विषयावर घुमजाव केलं. दिवाळीदरम्यात मुंबईत मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. यामुळे शहरात प्रचंड ध्वनी आणि वायू प्रदूषण होत असल्याचं मत पर्यावरणप्रेमी मांडतात. त्यांच्या म्हणण्याकडं कुणी फारसं लक्ष देत नाही. आता फटाकेबंदी या विषयावर बोलण्यासाठी काही आजीमाजी क्रीडापटूही पुढे आले, त्यांनी 'मुंबई लाइव्ह'शी संवाद साधताना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा सल्ला मुंबईकरांना दिला आहे.




'अॅटम बॉम्ब' वर बंदी घाला

दिवाळीत 'अॅटम बॉम्ब' सारख्या फटाक्यांवर बंदी असावी, असं मला वाटतं. इतरांना त्रास होणार नाही, असेच फटाके फोडावेत. सण जरूर उत्साहात साजरा करावा. पण फटाक्याचे दुष्परिणाम जाणून घ्यावेत. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचा वृद्ध, लहान मुले आणि प्राण्यांना त्रास होतो. त्यामुळे या फटाक्यांवर बंदी घालण्यात यावी, असं मत माजी क्रिकेटर अजित वाडेकर यांनी व्यक्त केलं.



रात्रीची फटाकेबाजी नको

प्रदूषण टाळण्यासाठी फटाकेबंदीचा निर्णय योग्य आहे. आपण हजारो, लाखाे रुपयांचे फटाके आणतो. पण त्यातून केवळ पैसे वाया जातात आणि प्रदूषणही होतं. फटाके उडवण्याचा अतिरेक होतो तेव्हा लोकांना देखील त्याचा त्रास होतो. खासकरून रात्री अपरात्री फटाके फोडण्याचा त्रास सर्वांनाच होतो. दिवाळी कुटुंबासोबत साजरी केल्यास तुम्हाला खूप समाधान आणि आनंद मिळेल, असं मत भारतीय हाॅकी संघाचा माजी कर्णधार धनराज पिल्ले यांनी नोंदवलं.




दिवाळी साधेपणानं साजरी करा

दिवाळी साधेपणाने साजरी केली पाहीजे. फटाकेबंदीचा निर्णय घेणं आवश्यक आहे. फटाक्यांमुळे खूप प्रदूषण होतं. काही जण तर रात्री २-३ वाजेपर्यंत फटाके फोडतात. हे चुकीचं आहे. याच फटाक्यांच्या पैशांतून आपण एखाद्या गरीबाला कपडे, फराळ दिला तर त्यांची दिवाळी सुखात जाईल. राज्यात शेतकरी रडत आहे आणि आपण फटाके फोडतो, हे योग्य नाही अशी खंत आतंरराष्ट्रीय पंच माधव गोठोस्कर यांनी व्यक्त केली.



जीवही धोक्यात येतो

फटाक्याच्या अतिरेकामुळे काही लोकांचा जीवही धोक्यात येतो. त्यामुळे सरकारने फटाकेबंदीचा निर्णय घ्यायला हवा, असं आॅलिम्पियन खेळाडू ललीता बाबर म्हणाली.



फटाके फोडूच नका

या दिवाळीत फटाके फोडू नका, असं सर्वाना मनापासून सांगतो. यामुळे वातावरण प्रदूषित तर होतंच, पण त्याचा त्रास आपल्याच कुटुंबाला, मुलांना आणि मित्रमंडळीला होतो. आपल्या स्वत:च्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. दिवाळीत आपल्या घरात सजावट करा, रोषणाई करुन दिवाळीची मजा लुटा. दिवाळीत मिठाई खा, पण फटाके फोडू नका, अशी विनंती क्रिकेटपटू युवराज सिंगने सोशल मीडियावरुन चाहत्यांना केली आहे.






आपल्याच आरोग्यावर परिणाम

फटाकेबंदी झालीच पाहिजे. दिवाळीत फक्त फटाके फोडून सण साजरा करणं चुकीचं आहे. फटाक्यांचा आपल्या आरोग्यावर हानीकारक परिणाम होतो. त्यामुळे फटाके फोडू नका, असं आवाहन मुंबईकर प्रो-कबड्डी स्टार रिशांक देवडीगा याने चाहत्यांना केलं आहे.



हेही वाचा -

दिवाळीत आकाश कंदील उडवाल, तर तुरूंगाची हवा खाल

यंदाच्या दिवाळीत गिफ्टचं नो टेन्शन! हे वाचा...



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा