Advertisement

कॅन्सरग्रस्त मुलांनी वाडियात साकारला किल्ला!


कॅन्सरग्रस्त मुलांनी वाडियात साकारला किल्ला!
SHARES

दिवाळी म्हणजे फराळ, नवीन कपडे, फटाके आणि धमाल-मजा मस्ती. हीच काय ती मुंबईतील मुलांची दिवाळीची मजा. पण दिवाळीची आणखी एक मजा मुंबईतील स्मार्टफोन, व्हिडीओ गेम आणि टीव्हीमध्ये अडकलेल्या कित्येक मुलांना कदाचित माहितच नसेल आणि ती म्हणजे दिवाळीत किल्ला बनवण्याची मजा. दिवाळीत मातीचा किल्ला बनवण्याची जुनी परंपरा असून खेड्यापाड्यातील मुले ही परंपरा आजही जपताना दिसतात. मुंबईत मात्र जागोजागी मुलांनी बनवलेले असे किल्ले पाहायला मिळत नाहीत.

असं असताना परळमधील वाडिया रूग्णालयात 200 मुलांनी सुंदर, आकर्षक असा छोटेखानी मातीचा किल्ला साकारला आहे.  राज्याच्या कानाकोपऱ्यातून कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावरील उपचारासाठी आलेल्या चिमुकल्यांनी हा किल्ला साकारला आहे.

प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, हा संदेश या चिमुकल्यांनी या आगळ्यावेगळ्या दिवाळी सेलिब्रेशनच्या माध्यमातून दिला आहे. तर या मुलांच्या चेहेऱ्यावर हसू यावं, दिवाळी साजरी करता यावी, म्हणून आम्ही हा किल्ला तयार करण्याचा उपक्रम राबवला. त्यात ही मुले सहभागी झाली आणि त्यातून त्यांनी खरोखर आनंद लुटला. त्यामुळे यापुढेही अशा मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न आम्ही करु.

डॉ. मिनी बोधनवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, वाडिया रूग्णालय

या चिमुकल्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी वाडिया रूग्णालयाकडून नेहमीच वेगवेगळे उपक्रम घेत त्यात अशा या रुग्णांना-चिमुकल्यांना सहभागी करून घेतले जाते. त्यानुसार दिवाळीत मातीच्या किल्ल्याचा उपक्रम वाडिया रुग्णालयाने राबवला आहे. 5 ते 14 वयोगटातील कॅन्सरग्रस्त मुलांनी मंगळवारी रूग्णालयाच्या परिसरात मातीचा किल्ला तयार केला. हा किल्ला तयार करताना या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच होता. किल्ला तयार करता-करता मातीत खेळण्याचा मनमुराद आनंद लुटतानाही ही मुलं दिसली. 



मी गावी दिवाळीत नेहमी किल्ला बनवते. पण आता मी हॉस्पिटलमध्ये आहे. मला दिवाळीत गावी जाता आलं नाही. त्यामुळे यावेळी मी किल्ला तयार करू शकणार नाही, याचं मला खूप वाईट वाटत होतं. पण आज मी किल्ला बनवला आणि मातीतही खेळले. मला खूप छान वाटलं, अशी निरागस प्रतिक्रिया किल्ला बनवणाऱ्या एका चिमुकलीने दिली. 



हेही वाचा

दिवाळीत आकाश कंदील उडवाल, तर तुरूंगाची हवा खाल


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा