Advertisement

यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणाची होणारी हानी घटली

यंदा परिस्थिती गंभीर असल्यानं समुद्रकिनारी कमी प्रमाणात गणेशमूर्ती पाहायला मिळाल्या. परिणामी पर्यावरणाची दरवर्षी होणारी हानी सुद्धा कमी झाली आहे.

यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणाची होणारी हानी घटली
SHARES

दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पाण्यात न विरघळलेल्या व भंगलेल्या गणेशमूर्ती समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. त्यामुळं नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पर्यावरणस्नेही/पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन मागील अनेक वर्षांपासून पर्यावरणप्रेमी करत आहेत. मात्र, याकडं नागरिक दुर्लक्ष करत असल्यानं पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. परंतु, यंदा परिस्थिती गंभीर असल्यानं समुद्रकिनारी कमी प्रमाणात गणेशमूर्ती पाहायला मिळाल्या. परिणामी पर्यावरणाची दरवर्षी होणारी हानी सुद्धा कमी झाली आहे.

पूर्वी सर्व गणपतींच्या मूर्ती मातीपासून बनविल्या जात होत्या व त्यांचं प्रमाणही फार कमी होतं. त्यामुळं मूर्ती पाण्यात मिसळत होत्या. तसंच मूर्ती रंगविण्यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर केला जात होता. त्यामुळं हे रंग घातक ठरत नव्हते. मात्र, आता बहुतांशी मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केल्या जात असून, या गणेशमूर्तीचं विसर्जन समुद्रात केलं जातं. त्यामुळं निसर्गाची पर्यायानं पर्यावरणाची हानी होतेच, पण त्याचबरोबर पाण्यातील जलचरांसाठीही ते धोकादायक ठरते. हे पीओपी लवकर पाण्यात विरघळत नाही किंवा विरघळलं तरी त्यासाठी फार काळ जातो. त्याशिवाय, या पीओपीमधील आर्सेनिकसारखे विषारी द्रव्य पाण्यात मिसळते.

हेही वाचा - Ganpati Visarjan 2020 यंदा शांततेत गणरायाला लाखो भाविक देणार निरोप

मूर्ती रंगविण्यासाठी हल्ली वापरले जाणारे रंगही रसायनयुक्त असतात. चंदेरी-सोनेरी असे रंग तर विशेषकरून त्रासदायक असतात. हे सर्व रासायनिक पदार्थ पाण्यात मिसळल्यानं पाण्याचं मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं व हे पाणी पिण्याच्या योग्यतेचं राहात नाही. त्यामुळं नदी-ओढे यात पाणी पिणारी माणसे, जनावरे तसेच समुद्रात समुद्री जीव मृत्युमुखी पडू शकतात. परंतु, कोरोनाचं सावट असल्यानं यंदाचा गणेशोत्सव नियमांखाली साजरा करण्यात आल्या. त्यामुळं पर्यावरणाची हानी विशेष म्हणजे समुद्रकिनारी न विरघळलेल्या व भंगलेल्या गणेशमूर्ती कमी प्रमाणात पाहायला मिळाल्या. त्यामुळं महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात येणाऱ्या जनजागृती यंदा यश आलं, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

हेही वाचा - 'या' मंडळांच्या मूर्तीचेच विसर्जन होणार समुद्रात

मुंबईसह राज्यावर कोरोनाचं संकट असल्यानं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन नागरिकांना केलं. त्याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळं पर्यावरणाची होणारी हानी यंदा टळली. त्याशिवाय, आगमन व विसर्जनासाठी महापालिका प्रशासनानं विशेष नियमावली जारी केली होती. त्यानुसार, मुंबईत ठिक-ठिकाणी कृत्रिम तलाव बांधण्यात आले होते व या तलांवमध्ये विसर्जन करण्याचं आवाहन महापालिकेनं होतं. या तलावांत दीड दिवसांच्या बाप्पांपासून १० दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं.

पोलिसांचा कडक बंदोबस्त

गणेशोत्सवात विसर्जनावेळी व आगमनावेळी पोलिसांचा कडक बदोबस्त ठेवण्यात आला होता. अनंत चतुर्दशीनिमित्त सार्वजनिक, खासगी गणेशमूर्तीचे विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी ३५ हजार पोलीस मनुष्यबळ ठेवण्यात आला होता. यावेळी भाविकांनी मूर्तीपूजा व आरती घरीच आटोपून घ्यावी. विसर्जनासाठी किंवा विसर्जन सोहळा पाहाण्यासाठी रस्त्यांवर तसेच विसर्जन स्थळांवर गर्दी करू नये. मूर्तीसोबत घराबाहेर पडणाऱ्यांनी मास्क, अंतर आदी सोवळे पाळावे, असं आवाहनही पोलिसांनी केलं.

गुलालाची उधळण कमी

आगमन व विसर्जन मिरवणुका रद्द करण्यात आल्यानं गुलालाचीही मागणी घटली. साधारण मंडळांमध्ये ५० ते १०० किलो तर मोठ्या मंडळांमध्ये २०० ते ५०० किलोपर्यंत गुलालाची उधळण होते. यंदा शेकडो टन गुलाल विक्रीवाचून पडला आहे. परिणामी गणेशोत्सवात कोटय़वधींची उलाढाल करणारी गुलालाची बाजारपेठ यंदा बेरंग झाली आहे.

सामाजिक बांधिलकीचं भान राखत गणेशोत्सव साजरा

समाजाची एकता व बंधुभाव वाढीस लागावा यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरूवात केली होती. अगदी ही सामाजिक बांधिलकी जपत अनेक गणेश मंडळांनी व घरोघरी बाप्पांचं आगमन करणाऱ्या भक्तांनी शाडू मातीच्या मूर्तीला प्राधान्य दिलं. त्याशिवाय, पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना करण्याच्या कल्पनेला प्राधान्य देत अनेकांनी घरी कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या पर्यावरणपूक गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे.

निर्माल्याचा वाईट परिणाम

गणेशोत्सवात निर्माण होणारे पत्री व फुलांचे निर्माल्य ओलसर असल्याने पावसाळ्याच्या दिवसात ते सडतात. गणेशोत्सवाच्या १० दिवसांत निघणारं निर्माल्य घराबाहेर किंवा उकिरड्यावर फेकतात व भटकी जनावरे इतरत्र पसरवितात आणि त्यामुळं रोगराई पसरण्याची शक्‍यता असते. तर काही जण हे सडलेले - कुजलेले निर्माल्य मोठ्या प्रमाणात गणपतीबरोबर पाण्यातच विसर्जित करतात. त्यामुळं पाणीही मोठ्या प्रमाणात खराब होतं.

महापालिकेची नियमावली

  • घरगुती गणेशमूर्तींचे आगमन मिरवणुकीच्या स्वरूपाचं नसावं. आगमनासाठी जास्तीत-जास्त ५ व्यक्तिंचा समूह असावा.
  • आगमनप्रसंगी मास्क/शिल्ड, सॅनिटायझर, सामाजिक अंतर इत्यादी स्वसंरक्षणाची साधनं काटेकोरपणे वापरण्यात यावीत.
  • घरगुती गणेशोत्सवासाठीची मूर्ती शक्यतो शाडूची असावी आणि या मूर्तीची उंची दोन फूटापेक्षा जास्त असू नये किंवा शक्य असल्यास यावर्षी पारंपरिक शाडूच्या गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू / संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. जेणेकरुन, आगमन / विसर्जनासाठी गर्दीत जाणं टाळून स्वतःचं / कुटुंबियांचं ‘कोविड-19’ साथ रोगापासून संरक्षण करणं शक्य होईल.
  • भाविकांनी स्थापन केलेल्या गणेशमूर्तीचं विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मूर्तीचं विसर्जन माघी गणेशोत्सव किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्या वेळीदेखील करता येणं शक्य आहे.
  • गणेशमूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचं विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावं. गणेशमूर्तींचं विसर्जन घरच्या-घरी करणं शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्तीचं विसर्जन करावं.
  • विसर्जनाच्या वेळी पाच व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्ती असू नयेत.
  • घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढू नये.
  • विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीत-कमी वेळ थांबावं. 
  • विसर्जनप्रसंगी मास्क / शिल्ड इत्या्दी स्वसंरक्षणाची साधनं काटेकोररित्या वापरावीत.
  • शक्यतो लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीनं विसर्जन स्थळी जावू नये.
  • घर / इमारत गणेशोत्सव कालावधीत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास प्रतिबंधित क्षेत्र नियमांचं पालन करावं.

यावर्षी नियमांमुळं गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्यात आला. तसंच, कृत्रिम तलावांत बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. आगमनही साद्यापद्धतीनं करण्यात आलं. विशेष म्हणजे २ दशकांतील गणेशोत्सवामधील सर्वात कमी ध्वनिप्रदूषणाची नोंद यंदा झाली. त्यामुळं ही कार्यपद्धती पुढीलवर्षापासून कायम टिकावी, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून या निमित्तानं व्यक्त होत आहे. 



हेही वाचा -

गणेशभक्त १० दिवसांच्या बाप्पाला देणार निरोप

बाप्पाच्या विसर्जनासाठी यंदा ४४५ विसर्जनस्थळं सज्ज


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा