Advertisement

मुंबईतील मूर्तिकारांसाठी स्वस्त दरात शाडूची माती

गणेशोत्सवाला आता काही महिने शिल्लक राहिले असून, गणेश मूर्ती घडविण्याच्या प्रक्रियेला लवकरच सुरूवात होणार आहे.

मुंबईतील मूर्तिकारांसाठी स्वस्त दरात शाडूची माती
SHARES

गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2021) आता काही महिने शिल्लक राहिले असून, गणेश मूर्ती घडविण्याच्या प्रक्रियेला लवकरच सुरूवात होणार आहे. त्यानुसार सर्व मूर्तीकार तयारी करत आहेत. दरम्यान राज्य सरकारनं कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला असल्यानं यंदाच्याही गणेशोत्सवावर कोरोनाचं (coronavirus) सावट असणार आहे. असं असलं तरी या कोरोनामुळं महागाई वाढली आहे. त्यामुळं यंदा गणेशोत्सवावर महागाईचंही संकट ओढावण्याची शक्यता आहे. परिणामी यातून मूर्तीकारांना दिलासा देण्यासाठी कलाकृती ग्रुपच्यावतीनं पुढाकार घेण्यात आला आहे.

मुंबईतील गणेश मूर्तिकारांसाठी आता स्वस्त दरात शाडूची माती उपलब्ध होणार आहे. यासाठी कलाकृती ग्रुपच्यावतीनं पुढाकार घेण्यात आला आहे. या ग्रुपचे सदस्य थेट गुजरातमधून शाडूची माती आणून मुंबईतील मूर्तिकारांना ती स्वस्त दरात उपलब्ध करून देत आहेत. पर्यावरणपूरक मूर्तींची संख्या वर्षागणिक वाढत असताना हल्ली शाडूच्या मातीच्या मूर्तींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, अनेक मूर्तिकार अजूनही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला जास्त प्राधान्य देत आहेत.

गेल्या वर्षी न्यायालयानं पीओपी मूर्तींवर बंदी आणल्यामुळे मूर्तिकारांची तारांबळ उडाली होती. अचानक शाडूच्या मातीची मागणी वाढल्यामुळे मोठ्या मूर्तिकार कारखानदारांना शाडूची माती मिळाली नाही. त्यामुळे शेवटी त्यांना पीओपीच्या मूर्ती बनवूनच विकणं भाग पडलं.

राज्य सरकारनं या सर्व मूर्तिकारांना शाडूची माती वाजवी दरात उपलब्ध करून देणं आवश्यक होतं. पण तसे झालेले नाही. शेवटी पीओपीचाच वापर झाल्यामुळे पीओपीच्या वापरावर बंदी आणून काहीच साध्य झाले नसल्याचे चित्र दिसून आले. कोरोनाचा प्रकोप कायम असल्याने येणाऱ्या गणेशोत्सवात सरकारने पुन्हा शाडूच्या मूर्तींची घोषणा केली तर पूर्वनियोजन म्हणून मुंबईतील कलाकृती ग्रुपने चक्क गुजरातमधून शाडूची माती आणण्याचे काम सुरू केले आहे.

गणेशोत्सव अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपला असताना सरकारच्या वतीने कोणतेच आदेश आलेले नाहीत. गणेशोत्सवासाठी लागणारा मंडप व गणेश मूर्तीची उंची याबद्दल अद्याप कोणतीच नियमावली जाहीर झालेली नाही. त्यामुळे सरकारने तातडीने नियमावली जाहीर करण्याची मागणी गणेशोत्सव मंडळ तसेच मूर्तिकार करीत आहेत. मूर्तिकारांना गणेशोत्सवातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच वर्षभर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे इतरांप्रमाणे गणेश मूर्तिकारांनादेखील सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कलाकृती ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे.



हेही वाचा -

मुंबई, ठाण्यातील सर्व दुकानं खुली

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी महापालिका सज्ज


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा