Advertisement

'आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी', मनसेचा अनोखा उपक्रम

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, माहीम विधानसभेतर्फे घरगुती बाप्पाच्या आगमनासाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे.

'आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी', मनसेचा अनोखा उपक्रम
SHARES

दरवर्षी मुंबईत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. मुंबईचा प्रत्येक परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघतो. बाप्पाचं आगमन आणि विसर्जनही मोठ्या थाटामाटात केलं जातं. गणेशोत्सवाच्या १५ दिवसआधीच सार्वजनिक बाप्पांचं आगमन होतं. तसंच, एक व दोन दिवसआधी घरगुती बाप्पांचं ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत आगमन होतं. परंतु, यंदा कोरोनाने सण-उत्सवालाही कमालिच्या मर्यादा घातल्या आहेत.  

ना मिरवणूक, ना ढोल ताशा, ना कसला उत्साह... यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकार व महापालिकेनं केल्यानं अनेक भक्तांना बाप्पाच्या आगमनाची चिंता सतावत आहे. मात्र, या चिंतेतून भक्तांची सुटका करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, माहीम विधानसभेतर्फे घरगुती बाप्पाच्या आगमनासाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांना यंदा बाप्पाच्या आगमनावेळी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना, माहीम विधानसभेतर्फे 'आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी' हा उपक्रम राबवण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितिन सरदेसाई यांच्या पुढाकारातून ही संकल्पना राबवण्यात येत आहे.  या उपक्रमाच्या मार्फत दादर, माहीम व प्रभादेवी विभागातील गणेशभक्तांना आपला बाप्पा घरी आणण्यासाठी वाहतूक सेवा दिली जाणार आहे. भक्तांना ही सुविधा पुरविण्यासाठी मनसेचे अनेक कार्यकर्ते आपल्या गाड्यांमधून बाप्पा घरी आणून देणार आहे. 

२२ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असल्यानं अनेकांच्या घरी बाप्पाचं आगमन होणार आहे. त्यामुळं गर्दीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं सुरक्षेच्या दुष्टीनं २ दिवसआधी म्हणजे २० व २१ ऑगस्ट रोजी भक्तांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. मनसेचे कार्यकर्ते वाहनाची सोय करून भाविकांना घरपोच बाप्पा आणून देणार आहेत. ही सेवा पूर्णपणे विनामूल्य असेल, अशी माहिती नितिन सरदेसाई यांनी दिली.

या सुविधेसाठी भक्तांना आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, गणेशमूर्ती कारखान्याचा पत्ता व नोंदणी पावती कार्यकर्त्यांना द्यायची आहे. या माहितीच्या आधारे कार्यकर्ते आपल्या घरी गणेशमूर्ती आणून देणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेनं हाती घेतलेल्या या उपक्रमाला गणेशभक्तांचा प्रतिसाद मिळतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हेही वाचा -

मुंबईत थेट विसर्जनाला बंदी, पालिकेनं दिले 'हे' पर्याय

बेस्टच्या आतापर्यंत 'इतक्या' कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाईRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा