वडापाव, समोसा, बर्गर हे पदार्थ म्हणजे मुंबईकरांचे जीव की प्राण. त्यातल्या त्यात वडापाव आणि समोसा हे तर स्वस्त आणि पोट भरणारे पदार्थ असल्यामुळे मुंबईकरांची पहिली पसंती ही त्यालाच असते. पण हे पदार्थ तेलकट आणि आरोग्यासाठी चांगले नसल्याचे आपण अनेकदा ऐकले असेल. पण सेंटर ऑफ सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट म्हणजेच 'सीएसई'नुसार समोसा आरोग्यासाठी अपायकारक नाही. धक्का बसला ना हे ऐकून? सीएसईच्या रिपोर्टनुसार बर्गरपेक्षा समोसा खाणं केव्हाही चांगलं!
सीएसईच्या रिपोर्टनुसार, बर्गरमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह असतात. बर्गरमध्ये वापरण्यात येणारे मसाले, सॉस आणि ब्रेड हे खूप दिवस साठवून ठेवले जाते. शिवाय स्वाद वाढवण्यासाठी त्यामध्ये आर्टिफिशियल फ्लेव्हर्स वापरले जातात. त्यामुळे तुम्हाला अॅसिडिटिचा त्रास उद्भवतो. याच्या अगदी उलट समोसाच्या बाबतीत आहे. समोसा बनवण्यासाठी वापरली जाणारी सामग्री ही रसायनमुक्त असते. रिफाइन्ड ऑईल, जिरे, उकडलेले बटाटे, मटार, मीठ, मिरची, मसाले, वनस्पती तेल किंवा तूप यांचा समावेश समोसामध्ये असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे समोसे गरम गरम अगदी ताजे तुम्ही खाऊ शकता.
बाहेर मिळणारा पॅक ज्सूस पिण्यापेक्षा घरात बनवलेला फ्रेश ज्यूस पिणं कधीही चांगलं. पॅक ज्सूसमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह असतात. ज्यूसला घट्ट आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी त्यात अनेक रसायनं टाकली जातात. त्यामुळे पॅक ज्यूस हा आरोग्यासाठी घातक आहे. याशिवाय सीएसईच्या रिपोर्टनुसार, नूडल्सच्या बदली पोहे खाणे फायदेशीर ठरेल.
सीएसईतर्फे सप्टेंबर २൦१६ आणि मार्च २൦१७ मध्ये 'नो युअर डाएट' हा सर्वे घेण्यात आला. १५ राज्यातील ९ ते १७ वयोगटातील जवळपास १३ हजार मुलांचा या सर्वेत सहभाग होता. या सर्वेनुसार मुलांच्या आहारात मीठ, साखर आणि चरबीयुक्त पदार्थांचा अधिक समावेश असल्याचं समोर आलं. अरबट चरबट पदार्थ खाण्याची मुलांची सवय वयानुसार वाढत जाते, हे या सर्वेतून स्पष्ट झालं.
हेही वाचा