Advertisement

थंडी वाढलीये..आहारात काय खाल, काय टाळाल?

मेंदूतील ‘हायपोथेलॅमस’ हा भाग आपल्या भुकेच्या इच्छेवर नियंत्रण ठेवतो. त्यातले ‘लॅटरल हायपोथेलॅमस’ हे केंद्र खाण्याची इच्छा जागवते आणि ‘व्हेन्ट्रो मीडियल हायपोथेलॅमस’ हे केंद्र भूक भागल्याचा संदेश देते.

थंडी वाढलीये..आहारात काय खाल, काय टाळाल?
SHARES

थंडी सुरू झाली, की भूक जास्त लागते. सारखं काहीतरी खावसं वाटतं. खरंतर थंडीत होणाऱ्या वातावरणाच्या बदलामुळे आपल्या शरीराला एनर्जी सेल्स म्हणजेच उर्जेची मोठ्या प्रमाणात गरज भासते. त्यामुळे शरीराला सतत खाण्याची इच्छा होते. त्यामागेही काही वैज्ञानिक कारणं आहेत.


जास्त भूक लागण्याची कारणं काय?

मेंदूतील ‘हायपोथेलॅमस’ हा भाग आपल्या भुकेच्या इच्छेवर नियंत्रण ठेवतो. त्यातले ‘लॅटरल हायपोथेलॅमस’ हे केंद्र खाण्याची इच्छा जागवते आणि ‘व्हेन्ट्रो मीडियल हायपोथेलॅमस’ हे केंद्र भूक भागल्याचा संदेश देते.



थंडीत शरीराचा ‘बेसल मेटाबॉलिक रेट’ वाढला की भूक जास्त लागते. भूक लागल्यावर जे खाल्लं जातं ते लवकर पचतं. अन्न पचल्यावर रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे रक्तातले ‘ग्लुकोस्टॅटिक रिसेप्टर्स’ लॅटरल हायपोथेलॅमसला साखरेचं प्रमाण कमी झाल्याचा संदेश देतात. मग लॅटरल हायपोथेलॅमस खाण्याची इच्छा निर्माण करतो. भूक भागल्यावर पुन्हा पुन्हा हीच प्रक्रिया शरीरात घडत राहते. त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होते. त्यामुळे थंडीत तुम्ही रात्री जरी जेवलात, तरी ते अन्न अगदी सहज पचतं. शरीराता उष्णता निर्माण व्हावी म्हणून आपण खातो. ज्यामुळे कॅलरीज बर्न होतात. कॅलरीज बर्न केल्यानंतर आपल्या शरीराचं तापमान कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.



डाएट प्लॅन

पण, थंडीत नेमकं काय खावं आणि काय खाऊ नये? याबाबत, आपण थोडा विचार करायला हवा. खरंतर, प्रत्येक व्यक्तीचा डाएट प्लॅन हा वेगळा असतो. त्यामुळे स्पेसिफिक असा डाएट प्लॅन थंडीत नाही केला, तरी चालतो. कारण, थंडीत खाल्लं जाणारं अन्न सहज पचतं. त्याचे काही साईड इफेक्ट्सही होत नाहीत. याच विषयी 'मुंबई लाइव्ह'ने 'वाचन आरोग्य' आणि 'डाएबिटीज केअर ३६५'च्या सल्लागार आणि क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट अंकिता घाग यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी थंडीत कशा प्रकारचा आहार घ्यावा? यावर सल्ला दिला आहे.

  • थंडीत पाण्याचं कमी प्रमाणात सेवन केलं जातं. त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते
  • दिवसातून एकदा तरी ताज्या फळांचा ज्यूस घ्यावा
  • थंडीत शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी तीळ, अळशी, हालिम, सनफ्लॉवरच्या बिया अशा पदार्थांचा आहारात वापर करा


हळद, सूंठ दुधातून घ्यावं

  • चहा घेत असाल, तर त्यात आल्याचा वापर करावा. शिवाय, ग्रीन टी देखील घेऊ शकता. ज्यात अॅन्टी अॉक्सिडंट्स असतात
  • तीळ, लसूण, मिरी, मोहरी, लवंग, जीरे, आलं, हिंग, तमालपत्र इत्यादी मसाल्यांचा जेवणात वापर करावा. याशिवाय बदाम, काजू, मनुका, अक्रोड इत्यादी सुका मेव्यामध्ये स्निग्ध उष्ण गुणधर्म असल्याने त्यांचा आहारात समावेश करावा
  • गहू, ज्वारी, बाजरी ह्या धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. भाकरीबरोबर लोणी किंवा तूप खावे
  • सर्व भाज्यांचं सेवन करावं आणि शिजवून खाव्यात. बाहेरच्या तळलेल्या पदार्थांचं सेवन करू नये
  • मटण, मांस, मासे, अंडी यांसारख्या मांसाहाराचाही आहारात समावेश करावा
  • कोमट पाणी प्यावं
  • संत्री, द्राक्षे या फळांमध्ये 'क' जीवनसत्त्व असतं. यामुळे त्वचेचं पोषण होतं. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच ही फळं चयापचय क्रियाही वाढवतात


हे करू नका

  • थंडीत फ्रिजमध्ये ठेवलेल्या दह्याचं सेवन करू नका. सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ शकतो
  • थंडीत थंड पेय पिणं टाळा
  • थंड दूध पिऊ नये
  • या दिवसात प्रथिनयुक्त आहार घ्यावा. ब्रेड, पांढरा भात असे पदार्थ टाळावेत
  • तेलकट पदार्थ टाळावेत


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा