Advertisement

लालभडक तर्रीवाली महाराष्ट्राची मिसळ!

पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ आणि जागोजागच्या मिसळ परंपरांनी खवय्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण खास करून फक्त मिसळ खाण्यासाठी पुणे, कोल्हापूर, लोणावळा गाठणं प्रत्येकालाच शक्य नसतं. मग विले-पार्लेतल्या सावरकर पटांगणाच्या मैदानात मिसळ चाखण्याची संधीच अशा खवय्यांना मिळाली आहे!

SHARES

मोड आलेली मटकी किंवा वाटाण्याची उसळ... लालबुंद रश्शाचा तवंग मिरवणारी खमंग तर्री... त्यावर फरसाण आणि ऐसपैस ट्रेच्या प्लेटमध्ये जिभेला खुणावणारे मिश्रण म्हणजेच कांदा, कोथिंबीर आणि पावाची लुसलुशीत लादी...आहाहा... तरतरी आणणारी झणझणीत आणि घाम फोडणारी चवदार मिसळ! कोणत्याही सुग्रास भोजनाएवढाच तिचा ऐटदार थाट असतो! तिचा हा थाट पाहून तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल!महोत्सवात हरतऱ्हेची मिसळ!

महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, पण मिसळची चव न चाखलेला माणूस महाराष्ट्रात आढळणं फार कठिण आहे. पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ आणि जागोजागच्या मिसळ परंपरांनी खवय्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण खास करून फक्त मिसळ खाण्यासाठी पुणे, कोल्हापूर, लोणावळा गाठणं प्रत्येकालाच शक्य नसतं. विले-पार्लेतल्या सावरकर पटांगणाच्या मैदानात मिसळ चाखण्याची संधी अशा खवय्यांना मिळाली. ९ आणि १൦ डिसेंबर असे दोन दिवस आयोजित मिसळोत्सवाला खवय्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला.पुण्याची 'नादखुळा', तर ठाण्याची 'मामलेदार'!

मिसळोत्सवाच्या निमित्तानं मुंबईकरांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या मिसळींची चव चाखता आली. पुण्याची 'नादखुळा मिसळ', नाशिकची 'माऊली मिसळ', पेणची 'तांडेल मिसळ', संगमेश्वरची 'मुळे मिसळ', ठाण्याची प्रसिद्ध 'मामलेदार मिसळ', कोल्हापूरची 'लक्ष्मी मिसळ', लोणावळ्याची 'मनशक्ती मिसळ' आणि आमची मुंबईची 'शेजवान मिसळ' अशा कित्येक प्रकारच्या मिसळींनी मुंबईकरांच्या जिभेचे चोचले पुरवले.मुंबईकरांना फुटला घाम!

खवय्यांचा देखील अपेक्षेप्रमाणेच मिसळोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. झणझणीत मिसळ चाखून मुंबईकरांना अक्षरश: घाम फुटला! पण ऐवढ्याशा गोष्टीमुळे थांबतील ते मुंबईकर कसले! कोल्हापूर, पुणे, पेण, लोणावळा इथल्या प्रसिद्ध मिसळ एकाच छताखाली चाखायला मिळत आहेत म्हटल्यावर खवय्यांनी त्यावर चांगलाच ताव मारला. बच्चे कंपनी, कॉलेज विद्यार्थ्यी ते अगदी आबालवृद्ध या सर्वांनीच मिसळोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. फक्त पार्लेकरच नाही, तर बोरिवली, माहीम, बदलापूर, गोरेगाव इथून देखील खवय्ये मिसळीचा आस्वाद घ्यायला आले होते.अवधूत गुप्तेचीही हजेरी!

मुंबईकरांसोबतच सेलिब्रिटींनीही मिसळोत्सवात हजेरी लावत मिसळीचा आस्वाद घेण्याची संधी सोडली नाही. या मिसळोत्सवात अवधूत गुप्ते यांनी हजेरी लावली होती. यासोबतच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी देखील मिसळोत्सवाला हजेरी लावली होती.हेही वाचा

लोकल ट्रेनच्या डब्ब्यातलं अतरंगी 'हंग्री जेडी' हॉटेल!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा