मुंबईत कोट्यवधीचा गुटखा जप्त


SHARE

राज्य सरकारने राज्यभर गुटखाबंदी केली तरी अजूनही अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने गुटखा विक्री सुरू असल्याचं समोर आलं आहे. अशा छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर एफडीए कायमच लक्ष ठेऊन असते. त्यानुसार, या चालू वर्षात करण्यात आलेल्या विशेष कारवाईत मुंबईतील काही परिसरातून एप्रिल ते सप्टेंबर या ६ महिन्यांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार, ४६ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

या छाप्यांमध्ये गुटख्यांची पाकिटे विक्रीसाठी ठेवल्याचं आढळून आलं असून त्याची बाजारभावानुसार किंमत १ कोटी २४ लाख ११ हजार ३२५ रूपये इतकी आहे.


गुटख्यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी एफडीए प्रयत्न करते. एप्रिल ते सप्टेंबर २०१७ या ६ महिन्यांच्या कालावधीत केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करण्यात आला. 

- शैलेश आढाव, सह-आयुक्त(अन्न),एफडीए


मिळालेल्या तक्रारीनुसार आम्ही तातडीने कारवाई करतो. मुंबईतील २४ वॉर्डात प्रत्येकी एक अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत असून आपापल्या विभागात ते काम करत आहेत. एप्रिल ते जुलैपर्यंत मुंबईतील विविध ठिकाणी ३३ छापे टाकण्यात आले असून ८६ लाख ८ हजार १७९ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. 

- बी. यू. पाटील, सहाय्यक आयुक्त(अन्न), एफडीए

या व्यतिरिक्त ऑगस्ट महिन्यात ५ धाडी टाकून १७ लाख, १ हजार ९७० रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला होता. तसंच सप्टेंबरमध्ये ८ छापे टाकून २१ लाख १ हजार १७६ रुपयांचा गुटखा जप्त केला. तर, ऑक्टोबर महिन्यात गेल्या १५ दिवसांत दोन छापे टाकण्यात आले असून ४२ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

मुंबईतील विशेषतः बी, सी आणि डी वॉर्डात गुटखा विक्री सुरू असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार करण्यात आलेल्या कारवाईत सर्वांधिक गुटखा जप्त केल्याचंही पाटील यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या