Advertisement

कुरकुरीत आणि चटपटीत चिप्सचा जनक माहित आहे का?

आपण एवढ्या आवडीनं खात असलेल्या चिप्सचा शोध कुणी आणि कसा लावला याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की या चिप्सचा शोध हा चुकून लागला. ही कहाणी भलतीच रंजक आहे...

कुरकुरीत आणि चटपटीत चिप्सचा जनक माहित आहे का?
SHARES

टाईम पाससाठी काही खायचं असेल, तर पहिलं प्राधान्य चिप्सला दिलं जातं. एकतर चिप्सची किंमत ५ ते १० रुपये असते. त्यामुळे खिशाला देखील परवडण्यासारखं असतं. शिवाय तुमचे जिभेचे चोचले देखील पुरवले जातात. यासोबतच उपवासात तर चिप्सला चांगलीच डिमांड असते. उपवासच कशाला? साखरपुडा, पूजा, वाढदिवस, बारसं किंवा अगदी छोटी-मोठी पार्टी अशा सर्वच ठिकाणी बटाटा चिप्सची चलती असते!



फक्त सण समारंभातच नाही, तर बाजारपेठेत देखील स्नॅक्स प्रकारामध्ये चिप्सचाच भाव वधारलेला असतो. जगात स्नॅक्सच्या विक्रीत बटाटा चिप्सचा सर्वाधिक खप होतो. सॉल्टेड म्हणजेच मीठ लावलेले बटाटा चिप्स सुरुवातीला अधिक खाल्ले जायचे. पण त्यात आता क्रांती झाली आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. आता खारट, चटपटे तर कधी मसालेदार असे वेगवेगळे फ्लेवर्सचे चिप्स खाता येतात

पण आपण एवढ्या आवडीनं खात असलेल्या चिप्सचा शोध कुणी आणि कसा लावला याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की या चिप्सचा शोध हा चुकून लागला. ही कहाणी भलतीच रंजक आहे...



चिप्सचा शोध कसा लागला?

१८५३ साली न्यूयॉर्कमधील 'सॅराटोगा स्प्रिंग' या गावात बटाटा चिप्सचा जन्म झाला. सॅराटोगा स्प्रिंग हे एक पर्यटन स्थळ म्हणून नावारुपाला येत होतं. कारण प्राकृतिक झरे, तलाव आणि बरीच निसर्गरम्य स्थळं इथली खासियत! त्यामुळे सॅराटोगा इथल्या तलावाच्या आजूबाजूला रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स जास्त आहेत.


सौजन्य


याच तलावाच्या काठावर 'मुन्स लेक हाऊस' नावाचे रेस्टॉरंट होते. या रेस्टॉरंटमध्ये दोन शेफ होते. एक शेफ होती कॅथरीन आणि दुसरा जॉर्ज क्रम्प. जॉर्ज क्रम्पला स्वयंपाकाचा खूप छंद होता. लेक हाऊसमध्ये येणाऱ्या प्रत्येक खवय्याला चविष्ट पदार्थ खाऊ घालण्यासाठी जॉर्ज वेगवेगळे प्रयोग करायचा. त्यामुळे त्यांच्या रेस्टॉरंटला नेहमीच गर्दी असायची.



२४ ऑगस्ट १८५३ साली एका गिऱ्हाकानं फ्राइड पोटॅटोची मागणी केली. जॉर्जनं त्याला ते सर्व्ह केले. मात्र गिऱ्हाईकानं त्या बटाट्याच्या जाड-जाड कापांबद्दल नाराजी व्यक्त केली आणि पुन्हा नव्यानं बनवून आणायला सांगितलं. प्रख्यात शेफ असणाऱ्या जॉर्जला हे अपमानास्पद वाटलं. त्यामुळे त्यानं मुद्दामून बटाट्याचे अतिपातळ काप करून ते जास्त वेळ तळले. जास्त वेळ तळल्यामुळे ते कुरकुरीत झाले. त्या ग्राहकाला आणखी डिवचावं यासाठी त्यानं कुरकुरीत वेफर्सवर खूप मीठ टाकले आणि ग्राहकासमोर सादर केले. बटाट्याचे हे काप खाऊन ग्राहक प्रचंड खूष झाला. त्यानं आणखी एक डिश मागवली. जॉर्जच्या चिप्सबद्दल त्यानं सर्व ग्राहकांना सांगितलं. जॉर्जच्या चिप्सची बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली आणि बटाट्याच्या वेफर्सचा जन्म झाला!


चिप्स पॅकेटमध्ये हवा जास्त का?

आपण पाहिलं असेल की चिप्सच्या पॅकेटमध्ये चिप्स कमी आणि हवा जास्त असते. यावरून अनेकदा तुम्ही रागही व्यक्त केला असेल. पण पॅकेटमध्ये हवा भरण्यामागे एक कारण आहे. हे कारण म्हणजे चिप्सचा हवेशी संपर्क येताच ते नरम होतात. यासाठी १९२६ साली लॉरा स्कडर यांनी प्लास्टिक पॅकमध्ये हवा भरून स्वत:च्या कंपनीकडून चिप्सची विक्री करायला सुरुवात केली. तेव्हापासून प्लास्टिकच्या हवाबंद पॅकेटमधून चिप्स विकले जातात. या पॅकेट्समध्ये भरण्यात येणारी हवा म्हणजे नायट्रोजन गॅस आहे. या गॅसमुळे चिप्स मोडत नाहीत आणि जास्त काळ पाकिटात टिकतात.



हेही वाचा

उन्हाळ्यात 'या' भाज्यांचे सेवन ठरेल फायदेशीर


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा