Advertisement

खानदानी राजधानीत नवरात्रोत्सवासाठी उपवासाची व्रत थाळी

व्रत थाळी एखाद्या माणसाचं पोट काय मन भरण्यासाठी देखील पुरेशी आहे. तुमचा उपवास असेल किंवा काही तरी वेगळं म्हणून व्रत थाळी ट्राय करायची असेल तर खानदानी राजधानीला नक्की भेट द्या.

खानदानी राजधानीत नवरात्रोत्सवासाठी उपवासाची व्रत थाळी
SHARES

भारतामध्ये वेगवेगळ्या पदार्थांची पारंपारीक चव आजही जोपासली जाते. घरगुती चवीचे पदार्थ असे बिरुद मिरवत ३०-४० वर्षांपूर्वी संपूर्ण मुंबईत नाव कमावलेल्या हॉटेलांनी ९० च्या दशकात मात्र याच पदार्थांच्या नव्या रेसिपी शोधून काढत त्यांनी दादही मिळवली. जसा काळ बदलला तसं या जुन्या हॉटेलांनी देखील कात टाकली. हॉटेलच्या नावाची पाटी बदलली. त्याएेवजी चकचकीत फ्लेक्स आले. हॉटेलातील लाकडी टेबल-खुर्च्या अाणि रंगवलेल्या हॉटेलच्या नावाची पाटी गेली आणि चकचकीत फ्लेक्स आले. लाकडी खुर्च्या बदलल्या. डिश आणून देणाऱ्या मामांच्या अंगावर गणवेश चढला. मेन्यू कार्डवर कधी न ऐकलेल्या-चाखलेल्या पदार्थांची नावंही चढली.


व्रत थाळी

त्याचवेळी मुंबईची बदलती जीवनपद्धती ओळखून तोपर्यंत घरीच बनवले जाणारे उपवासाचे पदार्थ हॉटेलमध्येही तयार होऊ लागले.  आता संकष्टी असो वा मार्गशीष असो किंवा नवरात्र उत्सव असो यावेळी हॉटेल्समध्ये उपवासाचे वेगवेगळे पदार्थ खास बनवले जातात. सणानुसार हा मेन्यू देखील बदलला जातो. 'खानदानी राजधानी' या रेस्टॉरंटमध्ये देखील नवरात्रोत्सवासाठी खास 'व्रत थाळी' लाँच केली आहे.


अबब... एवढी मोठी थाळी

अतिथी देवो भव: ही मूळ परंपरा जपत टिळा लावून आणि ओवाळणी करून हसतमुखानं इथं प्रथम स्वागत केलं जातं. टेबलावर आसनस्थ होताच ही भली मोठी थाळी आपली वाट पाहत असते. सहा-सात वाट्या, दोन-तीन डिश, दोन ग्लास असा सारा संसार मांडलेला असतो. एवढ्या मोठ्या थाळीतील पंच-पक्वानं पाहूनच पोट भरून जातं. थाळीतील पदार्थ पाहून ही थाळी एकट्यानं संपवायची कशी असाच प्रश्न पडतो.



व्रत थाळीची खासियत

लस्सी, कैरीचं पन्ह यापैकी एक सुरुवातीला तुमच्या समोर सादर केलं जाईल. या गर्मीत थंडगार लस्सी किंवा पन्हं पिऊन हायसं वाटतं. त्यानंतर उपवासाचे एक-एक पदार्थ आपल्या समोर सादर केले जातात. सलाडमध्ये कलिंगड सर्व्ह केलं जातं. थंडगार कलिंगड खाण्याची मजा काही वेगळीच. उपवासाचं नाव घेतोय मग साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडा विसरून कसं चालेल. व्रत थाळीत तुम्हाला साबुदाणा खिचडीचा आणि साबुदाणा वड्याचा देखील आस्वाद घेता येईल. फरसाणमध्ये उपवासाचे फराळी पॅटीस, कुट्टो पकोडा तर खाण्यात एक वेगळी चव आणते. जास्त गोडही नाही आणि तिखटही नाही असे पॅटीस, पकोडा खायला तुम्हाला नक्कीच आवडतील.


उपवासाला राजगिरा चिक्की आपण खातोच. त्याच राजगिऱ्याला त्यांनी वेगळा टच देत पुरी आणि थेपला हे पदार्थ बनवले आहेत. याच्या जोडीला सुरणची भाजी, पनीर मटारची भाजी आहेच. व्रत थाळीतील राजगिरा कढी आणि टॉमेटो डाल हे अप्रतिमच. कढी आणि टॉमेटो डाल या दोन पदार्थांची आंबट-गोड चव जिभेवर बराच वेळ रेंगाळते. हे काय कमी होतं त्यात आणखी दोन गोड पदार्थ व्रत थाळीत होते. जेवल्यावर गोड खाल्ल्यानं जेवणाची रंगत आणखी वाढते. मग तुमच्यासाठी थाळीत फ्रुट श्रीखंड, हलवा आणि बासुंदी यापैकी एक गोड पदार्थ सर्व्ह केला जातो. एवढी पंच-पक्वानं खाल्ल्यावर जेवण जिरावं म्हणून छास आहेच.


नवरात्री स्पेशल थाळी

हुश्श... ही व्रत थाळी एखाद्या माणसाचं पोट काय मन भरण्यासाठी देखील पुरेशी आहे. तुमचा उपवास असेल किंवा काही तरी वेगळं म्हणून व्रत थाळी ट्राय करायची असेल तर खानदानी राजधानीला नक्की भेट द्या. नवरात्रोत्सवासाठी खास ही थाळी लाँच करण्यात आली आहे. त्यामुळे १८ ऑक्टोबरपर्यंतच व्रत थाळीचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता.


कुठे : खानदानी राजधानीच्या सर्व आऊटलेटमध्ये तुम्ही व्रत थाळी ट्राय करू शकता. घाटकोपरच्या आरसीटी मॉलमध्ये देखील खानदानी राजधानीचं आऊटलेट आहे.



हेही वाचा 

स्मोक बार्बीक्यू छास ट्राय केलंत का?

खवय्यांसाठी कुल्फी वॉफल्सची ट्रिट




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा