Advertisement

अंधेरी पूल दुर्घटना: दुखापतग्रस्त महिला कोमात


अंधेरी पूल दुर्घटना: दुखापतग्रस्त महिला कोमात
SHARES

मंगळवारी सकाळी अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा पादचारी भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जण जखमी झाले. यापैकी २ जणांची प्रकृती गंभीर असून त्यातील अस्मिता काटकर (३६) ही महिला कोमात असल्याची माहिती कूपर रुग्णालयातील डाॅक्टरांनी दिली. तर मनोज मेहता यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


नेमकं काय घडलं?

दुर्घटनेच्या दिवशी सकाळी अस्मिता आपल्या मुलाला अंधेरी पूर्वेकडील परांजपे शाळेत सोडायला निघाल्या. त्यांच्यासाठी तर गोखले पूल हा नेहमीचाच रस्ता होता. मुलाला शाळेत सोडून परतीच्या वाटेला निघालेल्या असतानाच पुलाचा पादचारी भाग खचला आणि त्या पुलाच्या ढिगाऱ्याखाली सापडल्या.


शंका खरी ठरली

मुलाला शाळेत सोडून अस्मिता अजून घरी का आल्या नाहीत? या विचारात असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांनी अचानक टीव्हीवर सुरू असलेल्या बातम्या पहिल्या तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आपली बहीण तर त्या ढिगाऱ्याखाली नाही ना? असा प्रश्न मनात येताच अस्मिताचे भाऊ संजय घटनास्थळी गेले आणि त्यांच्या मनातील संशय खरा ठरला.

अस्मिता मूळच्या सावंतवाडीच्या. त्या पोळ्या लाटण्याचं काम करतात. तर त्यांचे पती लहू काटकर हे एक महाविद्यालयात सफाई कामगार म्हणून काम करतात. अस्मिता आणि लहू यांना सिद्धेश या नावाचा ६ वर्षांचा मुलगा आहे.


१६ फुटांवरून पडल्या

तब्बल १६ फूट उंचीवरून खाली पडलेल्या अस्मिता यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना त्वरीत कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांचा चेहरा, डावा हात आणि मेंदूला गंभीर इजा झाल्याने त्यांच्यावर त्वरीत शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली.

तर, मनोज मेहता यांच्या पाठीच्या मणक्याला मोठा मार लागला असून त्यांची प्रकृतीदेखील नाजूक असल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.


संकटातून बाहेर येऊ

सध्या अतिदक्षता विभागात असणाऱ्या अस्मिता यांची परिस्थिती नाजूक असली, तरी आमची बहीण या संकटातून लवकरात लवकर बाहेर येईल, असा विश्वास असल्याचं अस्मिता यांचे भाऊ संजय गवस म्हणाले.


या दुर्घटनेत अस्मिता यांच्या मेंदूत खूप रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर त्वरीत शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या अस्मिता यांची प्रकृती नाजूक असून डाॅक्टरांचं पथक त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहे.
- डॉ. गणेश शिंदे, वैद्यकीय अधिक्षक, कूपर रुग्णालय



हेही वाचा-

अंधेरी पुलाच्या दुघर्टनेचं खापर भाजपानं फोडलं पालिकेवर

ये दिल है मुश्किल जीना यहाँ...



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा