'अंतरा’ गर्भनिरोधक योग्य की अयोग्य? महिलांमध्ये संभ्रम...

  Mumbai
  'अंतरा’ गर्भनिरोधक योग्य की अयोग्य? महिलांमध्ये संभ्रम...
  मुंबई  -  

  राज्य सरकारने महिलांना गर्भनिरोधक गोळ्यांऐवजी 'अंतरा' इंजेक्शनचा पर्याय उपलब्ध करून दिला खरा, पण या इंजेक्शनचे महिलांवर दुष्परिणाम होत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. या चर्चेमुळे 'अंतरा' घेणे योग्य की अयोग? असा संभ्रम महिलांच्या मनात निर्माण झाला आहे.

  या इंजेक्शनमुळे महिलांच्या शरीरावर विविध दुष्परिणाम होत असून पाळी अनियमित होणे, पाळी दरम्यान अती रक्तस्त्राव होणे इ. तक्रारी आढळल्याचा मेसेज सोशल मीडियावर सध्या फिरत आहे. तर, या इंजेक्शनमुळे कुठलेही दुष्परिणाम होत नसून या इंजेक्शनला 'जागतिक आरोग्य संघटने' (WHO) कडून मान्यता मिळाल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

  महिलांसाठी गर्भनिरोधनाचे नवे साधन म्हणून 'अंतरा' इंजेक्शन एमपीएचा शुभारंभ ‘जागतिक लोकसंख्या दिनी’ म्हणजेच 11 जुलैला करण्यात आला.


  'अंतरा' इंजेक्शनमुळे महिलांना कुठलाही त्रास होणार नाही. सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजकडे कुणीही लक्ष देऊ नये. या इंजेक्शनमुळे महिलांचे हार्मोन्स बदलतील, पण मासिक पाळीवर त्याचा परिणाम होणार नाही.


  - डॉ. पद्मजा केसकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका


  हे इंजेक्शन आधीपासून खासगी रुग्णालयांत उपलब्ध होते. सरकारने सुरू केलेला उपक्रम चांगला आहे. हे एक हार्मोनल इंजेक्शन आहे. ज्या महिलांना नियमित गोळ्या घेता येत नाहीत, अशा महिलांसाठी हे इंजेक्शन महत्त्वाचे ठरेल. हे इंजेक्शन 3 महिन्यांतून एकदा घ्यायचे असल्याने महिलांची मासिक पाळी अनियमित होऊ शकते. पण त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत.


  - डॉ. गौरी गोरे, स्त्रीरोगतज्ज्ञ

  राज्य सरकारने हे इंजेक्शन प्रत्येक रुग्णालयात उपलब्ध करुन दिले असले, तरी सर्व महिलांनी या इंजेक्शनचा वापर केलाच पाहिजे असे नाही, अशा प्रकारचे मत काही स्त्रीरोगतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

  ज्यांना हे इंजेक्शन घ्यायचे अाहे, त्या महिलांनी आधी सोनोग्राफी करून घ्यावी. योग्य वैद्यकीय तपासणीनंतरच संबंधित महिलेला या इंजेक्शनची गरज आहे का? हे ठरवले पाहिजे. या इंजेक्शनमुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते. 3 ते 4 महिने मासिक पाळी बंद होऊ शकते. त्यामुळे त्यांचे वजन वाढू शकते, चेहऱ्यावर काळे डाग येऊ शकतात, स्वभावात बदल होऊ शकतो. म्हणून ज्या महिलांना खरोखर या इंजेक्शनची गरज आहे, त्यांनाच ते द्यावे.


  - डॉ. रंजना धानू, स्त्रीरोगतज्ज्ञ  हे देखील वाचा -

  पित्याने ‘सीपीआर’ देऊन वाचवले बाळाचे प्राण


  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.