Advertisement

पाठदुखी महिलांची पाठ सोडेना


पाठदुखी महिलांची पाठ सोडेना
SHARES

स्वतःच्या आरोग्याचा विचार न करता कुटुंबातल्या प्रत्येकासाठी राबराब राबणारी गृहिणी घराघरात दिसते. अगदी नोकरी, व्यवसाय सांभाळून घरच्या जबाबदाऱ्यांना न्याय देताना महिलांना काही दुखणी कधी जडतात, हेच लक्षात येत नाही. अनेकदा दुखणी किंवा आजारपण गंभीर वळणावर आल्यावर महिला डॉक्टरकडे धाव घेतात, अशी माहिती एका सर्वेक्षणांमधून पुढे आली आहे.  वैद्यकीय उपचारांची खरी गरज पडत नाही तोपर्यंत काही महिला डॉक्टरांकडे जात नाहीत, अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. कोकिळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयातील ऑर्थोपेडिक डॉक्टरांनी हे सर्वेक्षण केले होते.


सर्वेक्षणातून समोर आलेल्या काही बाबी-

सामाजिक आणि आर्थिक कारणांमुळे पुरुषांपेक्षा महिला अधिक प्रमाणात दुखण्याकडे शस्त्रक्रियेची वेळ येईपर्यंत दुर्लक्ष करतात. पुरुष दुखणी कमी सहन करतात. 90 टक्के पुरुष 5 वर्षांपेक्षा कमी काळ त्रास सहन करतात. महिलांच्या तुलनेत पुरुषांना पाठीची दुखणी उशिरा सुरू होतात. 


महिलांना घर आणि नोकरी अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळायच्या असतात. त्यामुळे महिलांमध्ये विविध दुखणी उद्भवतात. विशेष करून पाठीची दुखणी अधिक असतात. यात पाठीच्या कण्याचा त्रास, डी जीवनसत्त्वाचा अभाव, कॅल्शियमचा अभाव, खाण्याच्या चुकीच्या सवयी, काळजी न घेणे आणि व्यायाम न करणे या सवयी घातक आहेत. मूल झाल्यावर महिलांमध्ये अशक्तपणाचं प्रमाण  वाढतं आणि त्याचा ताण पाठीवर पडतो. म्हणूनच  महिलांनी वेळीच उपचार करून घेणे आवश्यक आहे.

-डॉ. विशाल पेशट्टीवावर, सर्जन विभाग प्रमुख, कोकिळाबेन अंबानी रुग्णालय


महिलांना का होतो पाठदुखीचा त्रास?

मूल झाल्यावर किंवा गरोदरपणात सर्वात जास्त ताण हा पाठीवर येतो. पाठीच्या मणक्यात बऱ्याचदा चमक किंवा अचानकच पाठीत जोरात दुखू लागते.

सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, अतिरिक्त कामाचा ताण, प्रत्येक गोष्टीत धावपळ आणि या सर्वांसाठी अपुरे कॅल्शिअम.
सतत काम करत राहिल्यामुळे, वाकल्या किंवा  जास्त वेळ बसल्यामुळे पाठीची हाडे ठिसूळ होतात. ज्यामुळे उठायचा, वाकायचा त्रास उद्भवतो.



उपाय काय?

  • चांगला सकस आहार घ्या.
  • रोज न विसरता दूध प्या.
  • जेवणात मांस किंवा शाकाहारी आहार घेत असाल तर पालेभाज्यांचा जास्त सेवन करा.
  • 'डी' जीवनसत्वाची कमतरता भासू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही सप्लीमेंट्स घ्यावीत.
  • दररोज 15 ते 20 मिनिटे व्यायाम करणे गरजेचे.
  • वारंवार पाठ, कंबर दुखत असेल तर तात्पुरती पेन किलर न घेता ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • तासनतास बसून काम करत असाल तर 5 ते 10 मिनिटे चाला.


पाठदुखीची तक्रार करणाऱ्यांमध्ये 60 टक्के हे महिलांचे प्रमाण असते. खूप कमी वयात गरोदर राहिलेल्या महिलेला याचा त्रास भविष्यात होतो. कारण, कॅल्शिअमसोबत हार्मोन्स देखील कमी होतात. पाठीचा कणा कमकुवत होतो. सर्व भार पाठीवर पडतो आणि मग पाठीची दुखणी जडतात. त्याची तीव्रता आधी जाणवत नाही. पण, कालांतराने त्याचा त्रास होतो.
- डॉ. प्रियांक, ऑर्थोपेडिक, वोक्हार्ट हॉस्पिटल



जवळपास एका ओपीडीत दिवसाला फक्त पाठीच्या दुखण्यासाठी 70 ते 80 महिला येतात. जर 200 एकूण रुग्ण असतील तर 60 टक्के महिलांचे प्रमाण आहे. पाठीच्या दुखण्याची बरीच आणि वेगवेगळी कारणे असतात. साधारण चाळीशी गाठलेल्या महिलांना अशी दुखणी आपोआपच जडतात.

- डॉ. ओम, ऑर्थोपेडिक शताब्दी रुग्णालय, कांदिवली


एकदा पाठीचे दुखणे कमी वयात जडले तर कायमस्वरुपी पाठीला छोटे मोठे दुखणे असतेच. आमच्याकडे दिवसाला येणाऱ्या 60 टक्के महिलांना पाठीच्या किंवा कंबरेच्या दुखण्याचा त्रास असतो. महिला जेव्हा गरोदर असते किंवा मूल झाल्यानंतर सर्व ताण पाठीच्या स्नायू आणि हाडांवर पडतो. त्यामुळे हाडे ढिसूळ होतात. किंवा पुन्हा प्रेगनंट राहिल्यानंतरही महिलांमध्ये अशा दुखण्याचे प्रमाण वाढते. शरीरात कॅल्शिअमचा अभाव असणे हेच यामागचे मोठे कारण आहे. साधारण 45 ते 65 वयोगटातील महिलांना असे दुखणे जास्त जडते. त्यासाठी रोज व्यायाम करणे गरजेचे आहे.

- डॉ. रविराज शिंदे, ऑर्थोपेडिक, सेंट जॉर्ज रुग्णालय


हेही वाचा - 

पालिका रुग्णालयातील डॉक्टर घेणार अवयव प्रत्यारोपणाचं प्रशिक्षण

घरोघरी सगळेच आजारी !


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा