Advertisement

डोण्ट गेट रेडी टू इट!


डोण्ट गेट रेडी टू इट!
SHARES

बदलत्या जीवनशैलीनुसार आपलं राहणीमान बदलू लागलं आहे. बदल हा सृष्टीचा नियम आहे. पण हा बदल आपल्यावर वरचढ तर होत नाही ना? याचा सुद्धा विचार केला पाहिजे. खरं सांगायचं तर जागतिकीकरणानंतर नव्या संधी निर्माण झाल्या. करिअरच्या संकल्पना बदलू लागल्या, जगण्याच्या तऱ्हा, कामाच्या पद्धती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाण्याच्या सवयी हे सारंच बदलत गेलं. एका नव्या जीवनशैलीनेच जन्म घेतला. अर्थातच या बदलाचे जेवढे फायदे आहेत तितकेच तोटे आहेत. पण बदलती जीवनशैली आणि राहणीमान याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर होतो. दिवसेंदिवस आपलं लाईफस्टाईल बदलत आहे. त्यानुसार आपल्या सवयीही बदलत चालल्यात.

भारतीय पाककृती आणि पदार्थांचं जगभरात कौतुक होतं. मात्र ऐवढं असूनही भारतीय बाजारपेठेत रेडी टू इट पदार्थांचा बोलबाला आहे. बाजारात रेडी टू इट किंवा रेडी टू कुक असे दोन प्रकारचे पदार्थ आहेत. भूक लागली की दोन मिनिटांत बनणारे किती तरी पदार्थ आहेत. पॅक पदार्थांमध्ये म्हणजे सुक्या पदार्थांमध्ये पाणी मिसळलं की गरमागरम पदार्थाचा तुम्ही आस्वाद घ्यायला मोकळे. यात काही शंका नाही की अशा पॅक पदार्थांमुळे तुमचा वेळही वाचतो आणि भूकही भागते. पण कधी विचार केला आहे का? की, या पदार्थांमधून तुमच्या शरीरात कोणती रसायनं जातात? ती रसायनं तुमच्या आरोग्यासाठी किती घातक ठरु शकतात? याचा साधा अंदाज देखील तुम्हाला नसेल. पण आपल्याला या पदार्थांची ऐवढी चटक लागली आहे की आता आपल्याला रेडी टू इट किंवा रेडी टू कुक पदार्थांची सवय झाली आहे

रेडी टू इथमध्ये हल्ली उपमा, पोहे, सूपपासून पंजाबी पदार्थ जसे पनीर मखनी, मटर पनीर, डोसा, इडली, फ्रेंच फ्राइज, नूडल्स, पास्ता आणि आता त्यात नवीन भर म्हणजे वाळवलेल्या भाज्या. ऐवढंच काय, हाफ बेक (थोड्या कच्च्या) चपात्याही बाजारात आल्या आहेत म्हणे! घरी आणायच्या आणि थोड्या शेकायच्या की चपात्या तयार! दिवसेंदिवस अशा पदार्थांची आणि हे पदार्थ खाणाऱ्यांचीही संख्या वाढत चालली आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत रेडी टू इट पदार्थांचा बोलबाला आहे. पण हे किती मजेशीर आहे ना? अति उच्च तापमानात मूळ धान्यातील नैसर्गिक पोषणमूल्ये काढून टाकली जातात. नंतर त्यात कृत्रिम कॅल्शियम, व्हिटामिन्स टाकली जातात. या पदार्थांची चव वाढवण्यासाठी त्यात मग रंग, मीठ, साखर आणि वेगवेगळे फ्लेवर्स टाकले जातात. महत्त्वाचं म्हणजे हे पदार्थ जास्त काळ टिकवण्यासाठी त्यात प्रिझव्‍‌र्हेटिव्ज घातले जातात. पण नेमकी कोणती रसायनं त्यात घातली जातात याचा काही आपल्याला थांगपत्ता नसतो. प्रत्येक पदार्थात मर्यादेच्या आतच प्रिझव्‍‌र्हेटिव्ज मिसळले जातात. पण समजा, असा पदार्थ दिवसातून तीन किंवा चार वेळा पोटात गेला तर? याचा अर्थ एका दिवसाला आपल्या शरीरात प्रमाणापेक्षा अधिक मीठ, साखर आणि अनेक प्रीझव्‍‌र्हेटिव्ज जातात. हल्ली तर डीप फ्रीझ करून नंतर उकळत्या तेलात तळलेले पदार्थही बाजारात उपलब्ध आहेत. त्यात फ्रेंच फ्राइज, आलू टिक्की असे अनेक पदार्थ आहेत. फ्रिजरमधून काढून गरम-गरम तेलातून तळून काढायचे. अगदी आवडीनं खाल्ले जातात घरोघरी हे पदार्थ. उणे ५० अंश सेल्सिअस ते २०० अंश सेल्सिअस एवढ्या कमी तापमानात ठेवल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये काय जीवनसत्व शिल्लक राहिली असतील? धक्कादायक म्हणजे डाएटिंगच्या नादात ओट्स, कॉर्न फ्लेक्स आणि मुसली असे पदार्थ पोटात ढकलले जातात.

 

रेडी टू इथ पदार्थांमध्ये अॅडेड सोडियम, अॅडेड शुगर आणि प्रीझव्‍‌र्हेटिव्ज असतात. या पदार्थांवर अतिउच्च तापमानात आणि उच्च दाबाखाली प्रक्रिया केली जाते. त्यामुळे या पदार्थांमधील नैसर्गिक पोषणमूल्ये नष्ट होतात.  एक प्रकारे रेडी टू इट पदार्थ हे शिळ्या अन्नामध्ये मोडतात. रेडी टू इट पदार्थ खाणाऱ्या स्त्रियांच्या गटाचा आणि असे पदार्थ न खाणाऱ्या स्त्रियांच्या गटाचा अभ्यास केला असता धक्कादायक वास्तव समोर आलं. आयुर्वेदानुसार रेडी टू इट पदार्थ जास्त खाणाऱ्यांना वाताचा त्रास होतो. त्यासोबतच अनेक आजारांना आपण स्वत:निमंत्रण देतो. ओट्ससारख्या पदार्थांमध्ये तर ग्लायसिमिक इंडेक्स असते. त्यामुळे असे अन्न पचवताना रक्तातील साखरेची पातळी वाढलेली असते. त्यामुळे समजा वजन कमी करण्यासाठी तुम्ही ओट्ससारखे पदार्थ खात असाल, तर कदाचित तुमचं वजन कमी सुद्धा होईल किंवा वाढूही शकेल. प्रत्येकाच्या शरीरावर याचे वेगवेगळे परिणाम दिसू शकतात.

- रुपाली पानसे, आयुर्वेदिक डॉक्टर (वैद्य)

रेडी टू इट पदार्थांमध्ये सर्रास मैदा आणि साखरेचा वापर केला जातो. पाव, पास्ता, बिस्किटे आणि असे कितीतरी पदार्थ. मैदा हा आतड्यांमध्ये चिकटून राहतो. त्यामुळे बद्धकोष्ठाच्या तक्रारी वाढतात. त्यात जर साखर आणि तेल यांचा समावेश असेल तर आरोग्याची ऐशी की तैशीच. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तरूण वर्ग अधिक रेडी टू इट पदार्थांच्या आहारी जात आहे. आजच्या पिढीचा परिणाम हा येणाऱ्या पिढीवर होऊ शकतो. कदाचित २०-२५ वर्षांनंतर येणाऱ्या पिढीला या आजाराचा सामना लहान वयात आणि मोठ्या प्रमाणात करावा लागू शकतो.

रेडी टू इट पदार्थ रोज तुमच्या खाण्यात असतील तर ते तुमच्या शरीरासाठी चांगलं नाही. कधी तरी हे पदार्थ चालतील. पण या पदार्थांच्या आहारी गेलात, तर अनेक आजारांचा सामना करावा लागतो. तुमच्या शरीरातील चरबी वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवेल. तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह वाढण्याची शक्यता असते. स्त्रियांना यामुळे पाळीचा (पीसीओडी) त्रास सहन करावा लागू शकतो. अशा पदार्थांऐवजी तुम्ही आरोग्याला पोषक अशा पदार्थांचा पर्याय निवडा. ताजे आणि फायबर युक्त (तंतुमय पदार्थ ) अन्न आणि सोबत थोडा व्यायाम शरीरासाठी फायदेशीर ठरेल. जसे की कडधान्य, दूध, फळं, भाज्या, ड्रायफ्रुट्स आणि तेलाचा कमीत कमी वापर याचा तुमच्या आहारात समावेश पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॅक फुड विकत घेताना तुम्ही त्यावर असणारी माहिती नीट वाचली पाहिजे. त्यामुळे अमूक अमूक पदार्थात किती साखर, मीठ आणि इतर प्रीझव्‍‌र्हेटिव्ज आहेत, हे तुम्हाला समजेल.

- प्राची वेल्हाळ, आहारतज्ज्ञ

तुम्ही असे पदार्थ रोज खात असाल तर एक दिवस अशी वेळ येईल की हे पदार्थच हळूहळू तुम्हाला गिळून टाकतील. बदलत्या जीवनशैलीचा स्वत:वर परिणाम होऊ देऊ नका. त्यामुळे आता तरी विचार करा. स्वत:वर नियंत्रण असेल तर सर्व शक्य आहे. त्यामुळे ताजे आणि आरोग्यास पोषक असे अन्न खा आणि स्वस्थ राहा.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा