Advertisement

'त्या' पाच वर्षांच्या चिमुकलीवर आठवड्याभरात लिंग दुरुस्ती शस्त्रक्रिया


'त्या' पाच वर्षांच्या चिमुकलीवर आठवड्याभरात लिंग दुरुस्ती शस्त्रक्रिया
SHARES

बीडमधील ललित साळवी याच्यावर यशस्वीरित्या लिंग दुरुस्ती शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर आता सेंट जॉर्ज रुग्णालयात दुसरी लिंग दुरुस्ती शस्त्रक्रिया पार पडणार आहे. बीड मधीलच 5 वर्षाच्या चिमुकलीवर लिंग दुरुस्ती शस्त्रक्रिया होणार असून आठवड्याभरात शस्त्रक्रिया पार पडेल, अशी माहिती सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


सेंट जॉर्जकडे विचारणा

ललित साळवीच्या शस्त्रक्रियेनंतर समाजात मोठं परिवर्तन दिसून येत असून लिंग समस्या असणारे मुली-मुलं आता निसंकोचपणे शस्त्रक्रियेसाठी पुढे येत आहेत. आतापर्यंत अंदाजे 16 जणांनी लिंग बदल-लिंग दुरुस्ती शस्त्रक्रियेसाठी सेंट जॉर्जकडे विचारणा केली आहे. यात या 5 वर्षाच्या मुलीचा आणि 37 वर्षीय रिता देवी यांचा समावेश आहे. दरम्यान 5 वर्षांच्या 'तिला तो व्हायचंय' ही बातमी सर्वांत आधी 'मुंबई लाइव्ह'नं दिली होती.


'ही' शस्त्रक्रिया पुढे ढकलली

ललित नंतर दुसरी शस्त्रक्रिया रिता देवीवर होणार होती. त्याप्रमाणे रिता देवींनी रुग्णालयात येऊन काही चाचण्या केल्या आहेत, पण काही तांत्रिक अडचणीमुळे तिच्यावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता दुसरी शस्त्रक्रिया ही बीड मधील 5 वर्षाच्या मुलीवर होणार आहे.


शस्त्रक्रिया आठवड्याभरात 

ती तीन वेळा रुग्णालयात येऊन चाचण्या पूर्ण करून गेली आहे. शस्त्रक्रियेसाठीच्या कायदेशीर बाबीची पूर्तता झाली आहे. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला असून येत्या आठवड्याभरात ही शस्त्रक्रिया पार पडेल, अशी माहिती डॉ. गायकवाड यांनी दिली आहे. तर ललितवर शस्त्रक्रिया करणारे प्लास्टिक सर्जन डॉ. रजत कपूर हेच शस्त्रक्रिया करणार असल्याचंही त्यानी सांगितलं आहे.


मुलगी नाही मुलगाच

ही 5 वर्षांची चिमकुली मुलगी नसून मुलगाच आहे हे चाचण्यांमधून सिद्ध झालं आहे. पण लिंग विकसित न झाल्यानं पालकांना ती मुलगी वाटली नि मुलीप्रमाणे तिला वाढवत तिचा सांभाळ करण्यात आला. पण ती मुलगी नसून मुलगा आहे, याची जाणीवही पालकांना होत होती. मात्र असं काही असतं याबद्दल काहीही माहिती नसल्यानं पालकांची घुसमट होत होती. पण ललितशी संपर्क साधत सर्व संभ्रम दूर करत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतल्याचंही डॉ. गायकवाड यांनी संगितलं आहे.


तर लिंग दुरुस्ती

हा रुग्ण मुलगाच असल्यानं लिंग बदल नाही, तर लिंग दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं डॉक्टरांचं सांगणं आहे. तर या शस्त्रक्रियेसाठी जी काही मदत या मुलीला लागेल ती करण्यात येईल, असं ही डॉ. गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा -

सेंट जाॅर्जेसमध्ये पार पडली पहिली 'मिरर हँड सर्जरी'

संबंधित विषय
Advertisement