Advertisement

मास्क न लावल्यास होणार कोरोना चाचणी, केडीएमसी प्रशासनाचा निर्णय

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अनेक नागरिक कोरोना नियमांच पालन करत नसल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे पालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने आता कडक पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे.

मास्क न लावल्यास होणार कोरोना चाचणी, केडीएमसी प्रशासनाचा निर्णय
SHARES

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अनेक नागरिक कोरोना नियमांच पालन करत नसल्याचं आढळून आलं आहे. तर अनेक जण मास्क न घालताच फिरत आहेत. अशा नागरिकांमुळे कोरोनाचा आणखी फैलाव होण्याची भिती आहे. त्यामुळे मास्क न लावणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय कल्याण - डोंबिवली महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

पालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने आता कडक पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. विना मास्क फिरणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी करून पॉझिटिव्ह रुग्णांची रवानगी थेट क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. तर लग्नसमारंभात नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित मंगल कार्यालय, लॉन ३० एप्रिल पर्यंत सील करण्यात येणार असल्याचं पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं.

वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीकोनातून अंमलबजावणी करण्यासाठी नुकतीच पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीस अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्ता कराळे, महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, पोलिस उप आयुक्त परिमंडळ-३ विवेक पानसरे, महापालिकेचे सर्व विभागीय उप आयुक्त,महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, महापालिका सचिव, संजय जाधव, महापालिका साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. पानपाटील, सहा. पोलीस आयुक्त अनिल पोवार, महापालिकेचे सर्व प्रभागक्षेत्र अधिकारी तसेच इतर पोलीस अधिकारी वर्ग उपस्थित होता.

मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर यापुढे कठोर कारवाईचा इशारा पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या बैठकीत दिला. गृह विलगीकरणातील रुग्ण बाहेर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं आयुक्तांनी यावेळी सांगितलं. तर मंगल कार्यालय, लॉन येथे पोलीस व महापालिका कर्मचारी यांनी समारंभाच्या वेळी समक्ष उपस्थित राहून नियंत्रण ठेवावे, अशा सूचना अतिरिक्त पोलिस उपआयुक्त दत्ता कराळे यांनी यावेळी केल्या. 

विनामास्क फिरणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. त्यानंतर कल्याणमधील जुने महात्मा फुले पोलीस ठाणे आणि डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात त्यांना नेण्यात येईल. या दोन्ही ठिकाणी उपस्थित डॉक्टरांकडून त्यांची कोविड चाचणी केली जाणार आहे. यामध्ये पॉझिटिव्ह आढळणाऱ्या व्यक्तींना थेट आयसोलेशन सेंटरला पाठवण्यात येणार आहे. शासनाच्या वतीने लागू केलेल्या निर्णयावर अंमलबजावणीसाठी केडीएमसी आणि पोलीस प्रशासन वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती केली जाणार आहे.



हेही वाचा -

लोकलमध्ये विनामास्क प्रवास केल्यास ५०० रुपयांचा दंड

महापालिका कार्यालयांत आरटीपीसीआर चाचणीशिवाय नागरिकांना प्रवेश बंदी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा