नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये केवळ मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यातून व इतरही राज्यातून जीवनावश्यक वस्तूंची आवक-जावक होत असते. परिणामी कोरोना संसर्ग प्रसाराच्या दृष्टीने हे अत्यंत जोखमीचे क्षेत्र आहे. त्यामुळे सुरूवातीपासूनच एपीएमसी मार्केटमधील भाजीपाला, फळे, कांदाबटाटा, दाणाबाजार, मसाला अशा पाचही मार्केटकडे नवी मुंबई महानगरपालिका विशेष लक्ष देत आहे.
नवी मुंबई महापालिकेने एपीएमसी मार्केटमधील दाणाबाजार येथे आता विशेष लसीकरण केंद्र सुरु केलं आहे. हे केंद्र शुक्रवारपासून कार्यान्वित करण्यात आलं आहे. लवकरात लवकर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यादृष्टीने लसीकरण केंद्र वाढवण्यावर पालिका भर देत आहे.
नागरिकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजीत बांगर संपूर्ण लसीकरण प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष देत आहेत. दररोज संध्याकाळी होणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वेबसंवादामध्ये याविषयीचा आढावा घेतला जात आहे. सध्याचा कडक उन्हाळा व आगामी पावसाळा कालावधी लक्षात घेऊन लसीकरण केंद्रांबाहेर शेड टाकणे, त्याठिकाणी पुरेशी बैठक व्यवस्था व पंख्याची व्यवस्था करणे अशा विविध बाबींचाही आढावा घेतला जात आहे.
सध्या महानगरपालिकेची ४ रुग्णालये, सर्व २३ नागरी आरोग्य केंद्रे, वाशी सेक्टर ५ येथील जम्बो लसीकरण केंद्र अशा २८ ठिकाणी लसीकरण सुरु आहे.
हेही वाचा -
संपूर्ण मुंबईत होणार ड्राईव्ह इन लसीकरण; तुमचं सेंटर जाणून घ्या!