Advertisement

भारतात कोरोना व्हायरसची एन्ट्री, आढळले २ रुग्ण

पहिले ३ रुग्ण नुकतेच बरे झाले असताना आता महाभयंकर असा कोरोनाव्हायरस भारतात पुन्हा आला आहे.

भारतात कोरोना व्हायरसची एन्ट्री, आढळले २ रुग्ण
SHARES

चीनहून (China) भारतात (India) परतलेले कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) पहिले ३ रुग्ण नुकतेच बरे झाले. भारत सुटकेचा निश्वास टाकतो न टाकतो तोच आता महाभयंकर असा कोरोनाव्हायरस भारतात पुन्हा आला आहे. देशात कोरोनाव्हायरसचे आणखी २ रुग्ण आढळून आलेत. नवी दिल्ली (New delhi) आणि तेलंगानामध्ये (Telangana) प्रत्येकी एक रुग्ण सापडल्याचं समोर आलं आहे.


कोरोनाचे २ रुग्ण

कोरोनाव्हायरसचे आधीचे ३ रुग्ण चीनहून आले होते. तर आता आढळून आलेले रुग्ण इटली आणि दुबईहून भारतात आलेत. नवी दिल्लीत आलेला रुग्ण इटलीहून तर तेलंगानामधील रुग्ण दुबईहून भारतात आला. या दोघांनाही आता वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती केंद्र सरकारनं दिली आहे.


विमानतळावर तपासणी

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून विमानांमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. मंगळवापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, . कोरिया, जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया येथून ५२,२२९ प्रवासी दाखल झाले. त्यांपैकी २९७ प्रवासी महाराष्ट्र राज्यात आले आहेत. त्यांच्या तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महापालिकांकडून आवश्यक मनुष्यबळ विमानतळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.


जपानमधून प्रवासी भारतात दाखल

जपानच्या योकोहामा बंदरात अडकलेल्या डायमंड प्रिन्सेस क्रूझवर कोरोनो व्हायरसच्या रुग्णांची संख्या  दिवसेंदिवस वाढत आहे. ३ फेब्रुवारीपासून ही क्रूझ जपानमध्ये आहे. या क्रूझमध्ये इतर प्रवाशांसोबत अनेक भारतीय होते. यापैकीच मुंबईत राहणारी २४ वर्षीय सोनाली ठाकूर ही क्रूझवर सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होती


अखेर भारतीयांची सुटका

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या व्हिडिओ कॉलिंग मुलाखतीद्वारे तिनं भारत सरकारला मदतीसाठी आवाहन केलं होतं.  "क्रूझवर संक्रमण वेगानं पसरत आहे. आम्ही सुद्धा या आजाराचे बळी पडू की काय? अशी भिती आम्हाला आहे. आम्हाला फक्त घरी परत जायचे आहे. आम्हाला भारत सरकारनं परत भारतात घेऊन जावं आणि तिथे उपचार करावेत. नाहीतर तुम्ही काही वैद्यकिय कर्मचाऱ्यांना आमच्या मदतीसाठी पाठवावं. कारण इथली वैद्यकिय सेवा अपुरी पडत आहे. क्रूझवरील प्रवाशांचे तपासणीसाठी नेलेले नमुने देखील येण्यास उशीर होत आहे." 

 त्यानंतर भारत सरकारनं त्या प्रवाशांना भारतात आणण्यासाठी जेट पाठवलं होतं. सध्या या सर्व प्रवाशांची तपासणी केली जात आहे. यांच्यापैकी कुणाला कोरोना झालं आहे की नाही यासंदर्भात अजून कुठलीच माहिती मिळाली नाही



हेही वाचा

कोरोना संदर्भात अफवा पसरवताय? होऊ शकते शिक्षा

गरम-थंड वातावरणामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा