Advertisement

मेट्रो ३ विरोधात आरेत 'चिपको आंदोलन'


मेट्रो ३ विरोधात आरेत 'चिपको आंदोलन'
SHARES

एमएमआरसीच्या मनमानीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करून काहीही होत नसल्याने शनिवारी 'वनशक्ती' आणि 'सेव्ह आरे'च्या कार्यकर्त्यांनी आरेत चिपको आंदोलन केलं. सोमवारपर्यंत काम बंद न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

आरेमध्ये बांधकामाला राष्ट्रीय हरित लवादाची बंदी असतानाही मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी) ने अनधिकृतपणे कामास सुरूवात केली आहे. त्यामुळे मेट्रो-३ कारशेडसाठी आरेची जागा देण्यास आणि झाडांची कत्तल करण्यास विरोध करणाऱ्या 'वनशक्ती' आणि 'सेव्ह आरे'च्या कार्यकर्त्यांनी आंदोलन पुन्हा तीव्र केलं आहे. 

दरम्यान, लवादाच्या आदेशाचं उल्लंघन करत अनधिकृत काम करणाऱ्या 'एमएमआरसी'ला रोखण्याएवजी आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असल्याचा आरोप वनशक्ती आणि सेव्ह आरेने 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केला आहे. कारण या आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी कलम १४९ च्या (प्रतिबंधात्मक) नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एमएमआरसी आणि पोलिसांविरोधातील संताप आणखी वाढला आहे.

२०१५ मध्ये राष्ट्रीय हरित लवादाने आरेत बांधकामास स्थगिती दिली आहे. त्यामुळे 'एमएमआरसी' असो वा इतर यंत्रणा कोणालाही येथे कोणत्याही प्रकारचं काम करता येत नाही. असे असताना 'एमएमआरसी'ने आरेचा परिसर बॅरिगेटस लावून बंद करत भरणीचं काम सुरू केलं आहे. तर दुसरीकडे झाडांची बेकायदा कत्तलही करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे सेव्ह आरे आणि वनशक्तीने चार-पाच दिवसांपूर्वी 'एमएमआरसी'विरोधात आरे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.



या तक्रारीनुसार 'एमएमआरसी'विरोधात कारवाई करण्याचं दूर पण वनशक्ती आणि आरेच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलीस आणि 'एमएमआरसी'कडून होत असल्याचा आरोप वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी केला आहे. दरम्यान शनिवारी सकाळी पर्यावरणप्रेमी, वनशक्ती-सेव्ह आरेचे कार्यकर्ते आणि स्थानिकांनी आरेत चिपको आंदोलन केलं. या आंदोलनात लहान मुले आणि शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. 


जिल्हाधिकारी देणार भेट

आरेतील बांधकामासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याचा दावा 'एमएमआरसी'ने केला. तर दुसरीकडे हा दावा साफ खोटा असल्याचा दावा वनशक्तीने केला आहे. माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यानी अशी कोणतीही परवानगी दिली नसल्याचे उघड झाल्याचे वनशक्तीने म्हटले आहे.

त्यानुसार वनशक्तीने उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं आहे. या पत्राची दखल घेत उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी आरेत भेट देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे आता सोमवारी या भेटीत नेमकं काय होतं, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.



हेही वाचा -

चर्चगेटमध्ये मेट्रो 3 ची नाईटशिफ्ट- न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन

'अहंकार कमी करा' हायकोर्टाने एमएमआरसीएला सुनावले



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा