सिडकोच्या १४ हजार ८३८ घरांच्या लाॅटरीतील ज्या विजेत्यांना आतापर्यंत कागदपत्र जमा करता आलेली नाहीत, अशा विजेत्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सिडकोने कागदपत्र जमा करण्याच्या मुदतीत वाढ केली असून विजेत्यांना आता १४ डिसेंबरपर्यंत कागदपत्र सादर करता येणार आहेत.
२ आॅक्टोबर रोजी सिडकोच्या घणसोली, तळोजा, खारघर, कळंबोली आणि द्रोणागिरी येथील १४ हजार ८३८ घरांसाठी लाॅटरी फुटली. या लाॅटरीची प्रक्रियेअंतर्गत सिडकोने त्वरीत कागदपत्र जमा करून घेत पात्रता निश्चितीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणं विजेत्यांना २४ नोव्हेंबरपर्यंत आॅनलाईन कागदपत्र जमा करण्याची मुदत सिडकोकडून देण्यात आली होती. ही मुदत शनिवारी संपणार होती.
सिडकोने दिलेल्या मुदतीत अनेक विजेते कागदपत्र जमा करू शकलेले नाहीत. त्यामुळे सिडकोनं कागदपत्र जमा करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी विजेत्यांची मागणी होती. ही मागणी मान्य करत सिडकोने अखेर मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता विजेत्यांना १४ डिसेंबरपर्यंत आॅनलाईन कागदपत्र जमा करता येणार आहेत. या मुदतवाढीचा फायदा घेत कागदपत्र जमा न केलेल्या विजेत्यांनी त्वरीत कागदपत्र जमा करावीत आणि आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करावं असं आवाहन सिडकोकडून करण्यात आलं आहे.
हेही वाचा-
मुंबईत लवकरच पहिला 'पीएमएवाय' प्रकल्प, झोपु प्राधिकरण बांधणार ४७,९८४ घरं
म्हाडा, एसआरए-सिडको नव्हेे; तर महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ बांधणार परवडणारी घरं