Advertisement

बीडीडीच्या निविदेत भ्रष्टाचार झाल्याचा काँग्रेसचा आरोप


बीडीडीच्या निविदेत भ्रष्टाचार झाल्याचा काँग्रेसचा आरोप
SHARES

बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे शनिवारी, 22 एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. दरम्यान हा प्रकल्प रहिवाशांच्या विरोधासह अन्य कारणांमुळे वादात अडकला असताना आता आणखी एका वादाची भर यात पडणार आहे. अखिल बीडीडी चाळ रहिवासी महासंघाचे सरचिटणीस आणि काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या बांधकामाच्या निविदेत भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. संपूर्ण निविदा प्रक्रिया संशयास्पद असून, म्हाडाच्या अधिकाऱ्यांपासून सर्वचजण यात सहभागी आहेत, असे म्हणत वाघमारे यांनी निविदा प्रक्रियेच्या चौकशीची मागणी केली आहे.

नायगावचे कंत्राट शापुरजी-पालनजीला तर ना. म. जोशीचे कंत्राट एल अॅण्ड टी ला देण्यात आले आहे. दरम्यान बीडीडीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हाडाने निविदा मागवल्या, पण या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने म्हाडाने निविदेला मुदतवाढ दिली. या मुदतवाढीत केवळ दोन निविदा सादर झाल्या आणि म्हाडाने दोन कंपन्यांना एक-एक कंत्राट दिले. निविदा प्रक्रियेचा अर्थ अधिकाधिक कंपन्या सहभागी व्हाव्यात आणि स्पर्धा व्हावी असा असतो. असे असताना दोन कंपन्यांना कंत्राट कसे दिले? पुन्हा मुदतवाढ का दिली नाही, असा सवालही वाघमारे यांनी केला आहे. बीडीडीपेक्षाही मोठा प्रकल्प असलेल्या धारावीला पाचवेळा मुदतवाढ देण्यात आली. तर निविदा न आल्याने प्रकल्प जैसे थे आहे, असे असताना बीडीडी चाळीच्या निविदेत मात्र म्हाडाने नियमांचा भंग करत मनमानीपणे निविदा दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या दोन्ही कंत्राटदारांकडून साधी अनामत रक्कमही भरून घेण्यात आली नसून घाईघाईत कंत्राट दिल्याचा आरोप अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीचे सरचिटणीस किरण माने यांनी केला आहे. त्यामुळे म्हाडा उपाध्यक्षांसह सर्व संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांच्या चौकशीची मागणी लवकरच करणार असल्याचेही माने आणि वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे. तर लवकरच म्हाडाविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याचेही वाघमारे यांनी सांगितले आहे. म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी यासंबंधी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण भुमिपूजनाच्या तयारीत अधिकारी असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

जांबोरीवर काळे झेंडे

म्हाडाला बीडीडीवासीयांचा विरोध असून, बीडीडीवासियांची फसवणूक करत हा प्रकल्प राबविला जात असल्याचे म्हणत अनेक संघटनांनी शनिवारी जांबोरीवर सरकार आणि म्हाडाविरोधात निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार संघटना आणि रहिवासी काळे झेंडे दाखवत निर्दशन करणार असल्याचेही माने यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा